हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर
युद्धामुळे ठाण्यात पुरवठ्यावर मर्यादा; वितरणात अडथळे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाची झळ आता देशाला बसत असल्याचे दिसून येत आहे. अशातच राज्यात अनेक ठिकाणी एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. ठाणे जिल्ह्यात सध्याच्या घडीला घरगुती गॅस सिलिंडर पुरेशा प्रमाणात असला तरी त्यासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. दुसरीकडे मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील व्यावसायिक गॅस विक्री पूर्णत: बंद करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे गॅसअभावी हॉटेलचालकांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या मध्य पूर्वेतील इराण, अमेरिका आणि इस्राईल यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या तणावामुळे खनिज तेल आणि गॅस वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. याचा फटका भारताला बसला असून देशातील अनेक राज्यांमध्ये गॅसच्या पुरवठ्यावरदेखील परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी गॅस मिळविण्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागल्याचे चित्र दिसून येत आहे. असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठ उपलब्ध असल्याची माहिती शिधावाटप कार्यालयाकडून देण्यात आली. मात्र हॉटेल्समध्ये वारण्यात येणारा व्यावसायिक गॅस सिलिंडर मागील चार दिवसांपासून पूर्णत: बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल्स व्यावसायिकांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, ठाणे ४१ फ परिमंडळ येथे सहा गॅस एजन्सी असून फ परिमंडळात ७२ गॅस एजन्सी आहेत. शिधावाटप कार्यालयाकडून या एजन्सींना घरगुती गॅस सिलिंडर वाटपासाठी प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आला आहे. यामध्ये ज्या ग्राहकांकडे एक सिलिंडर आहेत त्यांना प्राधान्याने गॅस उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. तर ज्या ग्राहकांकडे दोन गॅस सिलिंडर आहेत त्यांच्यासाठी २५ दिवसांची कालमर्यादा आखून दिल्याची महिती शिधावाटप कार्यालयाकडून देण्यात आली. तसेच ठाणे जिल्ह्यात कुठेही घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा नसून, ग्राहकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनदेखील केले आहे.
हॉटेल व्यवसायावर परिणाम
व्यावसायिक गॅसपुरवठा बंद असल्याने हॉटेलचालकांची मोठी अडचण होत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी हा पुरवठा असाच खंडित राहिल्यास पुढील चार-पाच दिवसांत हॉटेल व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
ठाणे जिल्ह्यातील गॅसपुरवठा उरण (बेंडखळ) आणि चेंबूर (माहुल) येथील रिफिलिंग स्टेशनवरून होतो. सध्या जिल्ह्यात ७२ गॅस एजन्सी कार्यरत आहेत. शिधावाटप विभागाने ग्राहकांना आवाहन केले आहे, की घरगुती गॅसचा तुटवडा नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
दोन ठिकाणी रिफिलिंग स्टेशन
ठाणे जिल्ह्यातील विविध भागात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा पुरवठा दोन ठिकाणाहून होत असतो. वापरलेले गॅस सिलिंडर रिफिलिंग स्टेशन हे उरण येथील बेंडखळ आणि चेंबूर येथील माहूल येथे असून, तेथून गॅसपुरवठा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्याच्या घडीला ठाण्यात अजून तरी हॉटेल्स व्यवसायावर फारसा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. मात्र परिस्थिती अशीच राहिल्यास आगामी चार ते पाच दिवसात शहरातील हॉटेल्स व्यवसायावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
- रत्नाकर शेट्टी, हॉटेल्स असोसिएशन, अध्यक्ष.
ठाणे जिल्ह्यात सध्याच्या घडीला गॅस सिलिंडरचा तुटवडा नसून, पुरेसा साठ उपलब्ध आहे. केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडर वाटप बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे घरगुती गॅस ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांना प्राधान्यक्रमानुसार सिलिंडर देण्याच्या सूचना शासनाच्या निर्देशानुसार एजन्सींना देण्यात आल्या आहेत.
- सुभाष डुंबरे, शिधावाटप अधिकारी, ४१ फ. ठाणे.