सिल्लोड - सिल्लोड पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या उंडणगाव गणातून निवडून आलेल्या अनिता सुरेश बनकर यांची तर उपसभापतीपदी निल्लोड गणातून विजयी झालेले भाजपचे भगवान शेनफड आहेर याची निवड झाली.
सभापती, उपसभापती पदाच्या निवडीसाठी मंगळवार (ता. 10) रोजी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये दुपारी दोन वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन उपजिल्हाधिकारी निलेश अपार, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांची उपस्थिती होती.
18 सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजपचे 10 तर शिवसेना (शिंदे गट) 8 सदस्य विजयी झाले होते. पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने भाजपच्या वतीने अनिता बनकर तर शिवसेनेच्या वतीने सुरेखा शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये भाजपच्या बनकर यांना 10 मते तर सेनेच्या शिंदे यांना 8 मते मिळाली. अनिता बनकर यांची सभापतीपदी निवड झाली.
उपसभापतीपदाच्या निवडीसाठी भाजपच्या वतीने भगवान आहेर तर सेनेच्या वतीने निजामखा पठाण यांच्यात झालेल्या लढतीमध्ये भाजपचे आहेर यांना 10 तर सेनेचे पठाण यांना 8 मते मिळाली. निवडीची घोषणा होताच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत घोषणाबाजी केली.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य वृषाली मिरकर, अनुराधा गवळे, गजानन जाधव, नेहा खरात, तेजस्विनी जगताप, नारायण खोमणे, सुमित्रा बनसोड, तुळसा कोठाळे यांचेसह भाजपचे सुरेश बनकर, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, भाजपा किसान मोर्चा महामंत्री मकरंद कोर्डे, माजी सभापती अशोक गरुड, दिलीप दाणेकर, नगरसेवक कमलेश कटारिया, मनोज मोरेल्लू, सुनील मिरकर, जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण काकडे, डॉ.सचिन वाघ, ज्ञानेश्वर तायडे, अनिल खरात, विजय वानखेडे, गणेश बनकर, गजानन राऊत, गणेश भूमकर, स्वप्निल शिनगारे यांची उपस्थिती होती.