जागतिक महिला दिनाच्या औचित्याने विक्रोळीतील (मूळ गाव-खडकी खुर्द.जि.-अहिल्यानगर)अवघ्या दहा वर्षांच्या जलतरणपटू मंथन मुरलीधर बांडे याने धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे तब्बल ३६ किलोमीटरचे सागरी अंतर पोहून पार करत एक प्रेरणादायी आणि रोमहर्षक कामगिरी नोंदवली आहे.त्याच्या या धाडसी जलप्रवासामुळे युवक-युवतींना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.
८ मार्च रोजी रात्री २.३० वाजता मंथनने महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून तसेच समुद्राची पूजा करून या ऐतिहासिक जलप्रवासाची सुरुवात केली.पुढील जवळपास नऊ तासांचा हा प्रवास अत्यंत आव्हानात्मक होता. समुद्रातील भरती-ओहोटीचा सतत बदलणारा खेळ, प्रचंड लाटा, मोठ्या मालवाहू जहाजांची सततची ये-जा आणि समुद्रावर पसरलेला तेलाचा तवंग अशा अनेक अडचणींचा सामना करत मंथनने आपल्या जिद्दीने हा प्रवास सुरू ठेवला.
या सर्व नैसर्गिक आणि मानवनिर्मित अडथळ्यांवर मात करत सकाळी ११.५० वाजता त्याने गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचून हा ३६ किमीचा सागरी जलप्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला.
गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचल्यानंतर महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांनी अधिकृत वेळ जाहीर करताच उपस्थित मित्र, नातेवाईक, क्रीडाप्रेमी तसेच त्याच्या शाळेतील प्रतिनिधींनी मंथनचे जल्लोषात स्वागत केले. टाळ्यांचा कडकडाट, अभिनंदनाचा वर्षाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात त्याच्या या पराक्रमाचा गौरव करण्यात आला.
मंथन सध्या हरियाली व्हिलेज सीबीएसई स्कूल, विक्रोळी येथे शिक्षण घेत असून अभ्यासाबरोबरच जलतरणातही सातत्याने मेहनत घेत आहे. तो नियमित सराव बीएमसी विक्रोळी येथील जलतरण तलावात 5-6 तास करत होता, तसेच सागरी पोहण्याचा सराव करण्यासाठी तो उरण येथील समुद्रातही विशेष प्रशिक्षण घेतो.
या धाडसी उपक्रमासाठी त्याला प्रशिक्षक राजू पालकर, रोहित चव्हाण, सतीश निंबाळकर आणि संतोष पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणामुळेच मंथन इतक्या कठीण परिस्थितीतही हे मोठे सागरी आव्हान यशस्वीरित्या पार केले.
मंथन यापूर्वीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्याने अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे १७ किलोमीटरचे सागरी अंतर पोहून त्यांना अनोखी मानवंदना अर्पण केली होती.तसेच मालवण येथे झालेल्या १५ व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत १० किलोमीटर आणि १ किलोमीटर स्पर्धांमध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
अवघ्या लहान वयात समुद्रातील कठीण आव्हानांना सामोरे जात ३६ किलोमीटरचा सागरी पराक्रम करणारा मंथन आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याचे पुढील मोठे ध्येय म्हणजे जगप्रसिद्ध “इंग्लिश खाडी” पार करण्याचे असून, त्यासाठी तो आतापासूनच कठोर तयारी करत आहे.