मुख्य प्रवेशद्वाराला अजित पवार यांचे नाव द्या
esakal March 11, 2026 10:45 PM

अजित पवार यांचे नाव मुख्य प्रवेशद्वाराला द्या
राष्ट्रवादी काँग्रेसची महापौरांकडे मागणी
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या राज्याच्या विकासातील अविस्मरणीय योगदानाचा गौरव करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प) प्रदेश सचिव वल्ली एस. राजन यांनी कल्याण-डोंबिवलीच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांची सदिच्छा भेट घेऊन यासंदर्भातील मागणीचे निवेदन सादर केले. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली असून, त्यांच्या कार्याची दखल स्थानिक प्रशासनाने घ्यावी, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. निवेदनात नमूद केल्यानुसार, अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीला मोठी चालना दिली. जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल असलेला आदर आणि प्रेम पाहता, महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देणे हा त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान ठरेल. महापालिका प्रशासन या मागणीवर सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा वल्ली एस. राजन यांनी व्यक्त केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-विमुक्त भटक्या जमाती सेलचे कल्याण जिल्हाध्यक्ष दिनेश परदेशी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संतोष पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत या मागणीला पाठिंबा दर्शवल्याने या विषयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.