(मुंबई टुडे साठी)सलग चौथ्यांदा एआययू इंटर-युनिव्हर्सिटी स्क्वॅश स्पर्धेचे यजमानपद सोमैया विद्याविहार विद्यापीठाकडे
esakal March 11, 2026 10:45 PM

सोमैया विद्याविहार विद्यापीठात स्क्वॅश स्पर्धेला सुरुवात

मुंबई, ता. ११ : देशातील विद्यापीठीय स्तरावरील एआययू-ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी स्क्वॅश टूर्नामेंट २०२५-२६ स्पर्धेला सोमैया विद्याविहार युनिव्हर्सिटी येथे सुरुवात झाली आहे. देशभरातील ३६ विद्यापीठांचे एकूण ७६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून, पुढील पाच दिवस विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. यात ४० पुरुष आणि ३६ महिला संघांचा समावेश आहे.
स्पर्धेचे सामने सोमैया स्पोर्ट्स अकादमी येथील पाच व्यावसायिक स्क्वॅश कोर्टवर खेळवले जात आहेत. प्रशिक्षण, सराव आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा एकाच कॅम्पसमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सलग चौथ्यांदा या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करत सोमैया विद्याविहार विद्यापीठाने आपल्या क्रीडा पायाभूत सुविधांची झलक दाखवली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू समीर सोमैया यांनी या सुविधा उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उच्च दर्जाचे क्रीडा प्रशिक्षण घेण्याची संधी मिळत असल्याचे विद्यापीठाने सांगितले.

स्क्वॅश चॅम्पियनशिपकडे वाटचाल
सोमैया स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक अझाझ खान यांनी सांगितले की, या स्पर्धेमुळे विद्यापीठातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट होत असून, ऑगस्ट २०२६ मध्ये भारतात होणाऱ्या एफआयएसयू विश्व विद्यापीठ स्क्वॅश स्पर्धा २०२६ साठीदेखील महत्त्वाची तयारी ठरणार आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील सुविधा, प्रशिक्षण व स्पर्धेचा अनुभव देणे हा आमचा उद्देश आहे. आमची एकप्रकारे चॅम्पियनशीपच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. दरम्यान, सर्वोच्च मानद प्रमुख प्रा. अजय कपूर यांनी सांगितले की, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना देशभरातील सर्वोत्तम खेळाडूंशी स्पर्धा करण्याची संधी मिळते आणि विद्यापीठीय क्रीडा संस्कृती अधिक बळकट होते. पुढील पाच दिवस कॅम्पसमधील स्क्वॅश कोर्टवर देशातील अव्वल मानांकित विद्यापीठीय खेळाडूंचे सामने रंगणार आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.