नवी दिल्ली : आगामी केरळ विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तयारी सुरु केली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज झाली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, अंबिका सोनी, टीएस देव यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत आगामी केरळ विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. सूत्रांनुसार या बैठकीनंतर काँग्रेसच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं.
सूत्रांच्या माहितीनुसार केरळ विधानसभेतील 140 पैकी 90 जागांवर लढण्याची तयारी रणनीती काँग्रेसनं बनवली आहे. उर्वरित जागा काँग्रेस त्यांच्या मित्रपक्षांना सोडणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पहिल्या यादीत काँग्रेसच्या 31 जागांवरील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. केरळ काँग्रेसकडून काही खासदारांना विधानसभा निवडणुकीत उतरवलं जाऊ शकतं. खासदार हिबी हिडेन, खासदार के सुधाकरण, खासदार के सुरेश विधानसभा निवडणूक लढण्यास तयार आहेत.
राहुल गांधी यांनी केरळ विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थिती वाढवली आहे. तरुण, महिला यांच्यासाठी सामाजिक कल्याणकारी योजनांबाबत राहुल गांधींनी घोषणा केल्या आहेत. याकडे काँग्रेसकडून निवडणुकीची तयारी म्हणून पाहिलं जातंय.
केरळ विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. केरळमध्ये प्रमुख सामना डाव्या पक्षांच्या एलडीएफ आघाडी आणि दुसरीकडे काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या यूडीएफ यांच्यात आहे. भाजपनं केरळमध्ये यावेळी जोरदार तयारी केलेली आहे. केरळमध्ये गेल्या दोन टर्मपासून डाव्या पक्षांचं सरकार आहे. काँग्रेस केरळमधील प्रमुख विरोधी पक्ष आहे. तर भाजप इथं तिसऱ्या स्थानावर होता.