उमरगा, (जि. धाराशिव) : तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या नाईचाकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व प्रशालेचा अमृत महोत्सवी सोहळा शुक्रवारी (ता. २०) अत्यंत उत्साहात पार पडला. ७५ वर्षांचा देदीप्यमान वारसा लाभलेल्या या शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेत तब्बल २६ लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. ग्रामीण भागातील सरकारी शाळेबद्दलची ही आत्मीयता राज्यासाठी आदर्श ठरणारी आहे. दरम्यान ७५ वर्षांच्या या प्रवासात सहभागी असलेल्या शिक्षकां विषयी कृतज्ञता अन् जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने अनेकांचे डोळे पाणावले होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संस्थाप्रभात फेरीने वेधले लक्ष
सोहळ्याची सुरुवात अतिशय दिमाखदार प्रभात फेरीने झाली. जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख व पंचायत समिती सदस्या सुगलाबाई मदने यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. पालखी मिरवणूक आणि शिस्तबद्ध गणवेशातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. दरम्यान शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. दिलीप गरुड यांनी सर्वांना सोबत घेत शाळेचा अमृत महोत्सव सोहळा घडवून आणला. त्यात माजी विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा आहे.
जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता अव्वल : आमदार प्रविण स्वामी
कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटन आमदार प्रवीण स्वामी आणि 'मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ता योजना' समितीचे सहअध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना आमदार स्वामी म्हणाले की, "आजच्या इंग्रजी माध्यमांच्या स्पर्धेतही जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता आजही अव्वल आहे. या शाळेने ७५ वर्षांत हजारो सुशिक्षित नागरिक आणि अधिकारी घडवले आहेत. शाळेच्या क्रीडांगण विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल." या वेळी कृषि भूषण गोविंद पवार, उद्योजक वैभव पवार, फुलचंद इंगलवार, जगदिश धूत, गोविंद धूत, संभाजी बिग्रेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, मुंबईच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिता इटुबोने, रिल स्टार राहुल लकडे, भंडाऱ्याचे उपशिक्षणाधिकारी राहुल बावा, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती किसन कांबळे, माजी बांधकाम सभापती गोविंद पवार, रावसाहेब पवार, धवलक्रांतीचे सतीश पवार, केशव पवार, शेषेराव पवार, सरपंच चंद्रकांत स्वामी, उपसरपंच भिमाशंकर पवार, सिध्देश्वर माने, आण्णासाहेब पवार, भैरवनाथ कानडे, माध्यमिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल पवार, प्राथमिक विभागाच्या अध्यक्षा शीतल सिध्देश्वर माने आदींची उपस्थिती होती. मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. हणमंत पवार यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे शिक्षक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
शरण फाऊंडेशनतर्फे पाच लाखांची मदत
शरण पाटील यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करत 'शरण पाटील फाऊंडेशन'च्या वतीने पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच परिसरातील पाणंद रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. माजी प्राचार्य डॉ. दिलीप गरूड यांच्या नेतृत्वाखाली माजी विद्यार्थी संघटनेने या सोहळ्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.