IPL 2026 : Angkrish Raghuvanshi चा शतकी तडाखा, सराव सामन्यात झंझावाती खेळी
Tv9 Marathi March 21, 2026 06:45 AM

आयपीएलच्या 19 व्या मोसमाचं काउंटडाऊन सुरु आहे. या 19 व्या पर्वाचा थरार 28 मार्चपासून सुरु होणार आहे. एकूण 10 संघांमध्ये पहिल्या टप्प्यात 20 सामने होणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघाला 4 सामने खेळायचे आहेत. स्पर्धेआधी खेळाडूंना सराव व्हावा याची पूर्ण काळजी टीम मॅनेजमेंट आणि कोचिंग स्टाफकडून घेतली जात आहे. खेळाडूंची तयारी व्हावी म्हणून केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्स टीमने आपआपसात सराव सामना खेळला. या सराव सामन्यात देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अंगकृष रघुवंशी याने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंगकृषने या सराव सामन्यात वादळी खेळी करत झंझावाती शतक ठोकलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्स टीममधील खेळाडूंमध्ये शुक्रवारी 20 मार्च रोजी इडन गार्ड्न्समध्ये पहिल्या सराव सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. केकेआरच्या सर्व खेळाडूंना या सामन्यासाठी 2 संघांमध्ये विभागण्यात आलं. गोल्ड नाईट्स विरुद्ध पर्पल नाईट्स या 2 संघांमध्ये खेळाडूंना विभागण्यात आलं.

गोल्ड नाईट्ससाठी रिंकु सिंह याने 40 तर टीम सायफर्ट याने 30 धावा केल्या. तर टीम सायफर्ट याने 30 धावांचं योगदान दिलं. सार्थक रंजन याने 37 धावा ठोकल्या. या तिघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर टीमने 199 धावा केल्या. तर पर्पल नाईट्ससाठी कार्तिक त्यागी याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.

अंगकृषचं कडक शतक

पर्पल नाईट्ससाठी फिन एलन याने वादळी सुरुवात केली. मात्र कर्णधार अजिंक्य रहाणे अपयशी ठरला. अजिंक्य झटपट आऊट झाला. त्यानंतर अंगकृष रघुवंशी याने टीमची धुरा सांभाळली. अंगकृषने सावध आणि संथ सुरुवात केली. मात्र जम बसल्यावर अंगकृषने गिअर बदलला. अंगकृषने अवघ्या 29 चेंडूत अर्धशतक झळकावलं. अंगकृषने हाच तडाखा कायम ठेवत शतकापर्यंत मजल मारली. अंगकृषने 55 चेंडूत शतक पूर्ण केलं.

अंगकृषने 20 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर फोर ठोकत शतक पूर्ण केलं. अंगकृषने यासह टीमला विजयी केलं. अंगकृषने या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 103 धावांची खेळी केली. अंगकृषच्या या खेळीच्या जोरावर पर्पल नाईट्सने 6 विकेट्सने विजय मिळवला.

केकेआरसमोर पहिल्या सामन्यात कुणाचं आव्हान?

दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स या 19 व्या मोसमातील आपला पहिला सामना हा 29 मार्च रोजी खेळणार आहे. केकेआरसमोर या सामन्यात मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे. मुंबईचाही हा या पर्वातील पहिलाच सामना असणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.