US National Archives
इराणने हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया येथील ब्रिटिश लष्करी तळाच्या दिशेने 2 क्षेपणास्त्रे डागली आहेत. असं असलं तरी, यातील एकही क्षेपणास्त्र ब्रिटिश तळापर्यंत पोहोचले नाही.
ब्रिटनने शुक्रवारी (20 मार्च) म्हटलं होतं की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणी हल्ले रोखण्यासाठी त्यांच्या लष्करी तळाचा वापर केला जाऊ शकतो.
याला प्रत्युत्तर म्हणून, इराणने ब्रिटनला इशारा दिला की, अमेरिकेने लष्करी तळाचा वापर करणे हे "तणाव वाढवण्याच्या" स्वरुपात पाहिले जाईल.
शनिवारी (21 मार्च) इराणच्या 'अयशस्वी' क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे इराण आणि मध्य-पूर्वेतील संघर्ष भारताच्या हद्दीत म्हणजेच हिंदी महासागरात पोहोचला आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
ट्रम्प यांचे इराण विरोधातील युद्ध आवरते घेण्याचे संकेत, नेमकं काय म्हणाले?दरम्यान, इराणविरुद्धची अमेरिकेची लष्करी मोहीम आता आवरती घेण्याचा विचार सुरू असल्याचा संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
त्यांनी मध्य पूर्वेतील महत्त्वाची उद्दिष्टे साध्य होत असल्याचा दावा केला. पण, होर्मुझ सामुद्रधुनीचे रक्षण आता इतर देशांनी करावे, असंही त्यांनी स्पष्ट केले.
Getty Images
मध्य पूर्वेत इराणच्या दहशतवादी राजवटीविरुद्ध आमच्या महान लष्करी मोहिमेचा शेवट करण्याचा विचार करताना आम्ही आमचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या खूप जवळ पोहोचलो आहोत:
होर्मुझ सामुद्रधुनीचे रक्षण आणि नियंत्रण ती वापरणाऱ्या इतर राष्ट्रांनी करायला हवे, कारण अमेरिका ती वापरत नाही.
विनंती केल्यास आम्ही त्या देशांना मदत करू, परंतु एकदा इराणचा धोका संपुष्टात आला की त्याची गरज भासू नये.
महत्त्वाचे म्हणजे, ही त्यांच्या दृष्टीने एक सोपी लष्करी कारवाई ठरेल.
'नतान्झ अणु केंद्रावर पुन्हा हल्ला', इराणचा दावा"मध्य इराणमधील नतान्झ अणु केंद्रावर आज सकाळी पुन्हा हल्ला झाला," अशी माहिती इराणच्या अणुऊर्जा संघटनेने दिली आहे.
इराणी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, "तपासात असे दिसून आले आहे की, या केंद्रामधून कोणत्याही किरणोत्सर्गी पदार्थाची गळती झालेली नाही. आजूबाजूच्या परिसरातील लोकांना कोणताही धोका नाही."
इराणच्या अणुऊर्जा संघटनेने या हल्ल्याचा निषेध केला. तसेच "हे अणुप्रसारबंदी करार (NPT) आणि इतर अणुसुरक्षा नियमांचे उल्लंघन आहे," असंही म्हटलं.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) एका एक्स-पोस्टमध्ये म्हटले, "इराणने आम्हाला कळवले आहे की, आज नतान्झ अणु केंद्रावर हल्ला झाला. हल्ल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात किरणोत्सर्गाच्या पातळीत कोणतीही वाढ नोंदवली गेली नाही. आम्ही याची चौकशी करत आहोत."
"अणु अपघाताचा धोका टाळण्यासाठी IAEA च्या महासंचालकांनी पुन्हा एकदा लष्करी संयम राखण्याचे आवाहन केले आहे."
इराणच्या अणुऊर्जा संघटनेने यापूर्वी नतान्झवरील हल्ल्याची कबुली दिली होती. 3 मार्चला, असे सांगण्यात आले होते की, 2 दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतर कोणत्याही किरणोत्साराची गळती नोंदवली गेली नाही.
जून 2025 मध्ये, अमेरिकेने नतान्झ, फोर्डो आणि इस्फहान या 3 अणु केंद्रांवर बॉम्बहल्ला केला होता. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, या हल्ल्यांमुळे इराणचा अणुकार्यक्रम "पूर्णपणे नष्ट" झाला आहे.
इराणने दिली संयुक्त अरब अमिरातीच्या 'या' शहरावर 'मोठ्या हल्ल्याची' धमकीइराणने संयुक्त अरब अमिरातीतील रास अल-खैमाह या शहरावर 'निर्णायक ताकदीने' हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
पर्शियन आखातातील दोन बेटांच्या मुद्द्यावरून यूएईसोबत दीर्घकाळ सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर इराणने ही धमकी दिली आहे.
सरकारी माध्यमांनी टेलिग्रामवर प्रसिद्ध केलेल्या संदेशात इराणच्या सशस्त्र दलांच्या प्रवक्त्याने असा इशारा दिला आहे की 'अबू मूसा आणि ग्रेटर टुनब बेटांवर कोणतीही नवीन आक्रमक कारवाई झाल्यास त्याला यूएईतील त्या शहरावर हल्ला करून प्रत्युत्तर दिलं जाईल.'
या संदेशात आक्रमकतेचे स्वरुप स्पष्ट करण्यात आलेले नाही, मात्र ही धमकी अशा वेळी आली आहे जेव्हा ही दोन्ही बेटे अनेक दशकांपासून इराणच्या नियंत्रणाखाली आहेत.
ही बेटे पर्शियन आखातात स्थित असून सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जातात. यूएईने या दोन्ही बेटांवर आपला दावा केला आहे.
इराणी तेलावरील निर्बंध शिथिलअमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने समुद्रात असलेल्या इराणी तेलावरील निर्बंध तात्पुरते शिथिल केले आहेत. त्यामुळे इराणला हे तेल बहुतेक देशांना विकता येईल आणि त्यामुळे जागतिक बाजारातील तेलाचे दर नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.
शुक्रवारी X वर पोस्ट केलेल्या निवेदनात अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सांगितले की या "अल्पकालीन परवानगी"मुळे सुमारे 14 कोटी बॅरल इराणी तेल जागतिक बाजारात येऊ शकेल.
बेसेंट म्हणाले की या तेलविक्रीतून होणारा आर्थिक फायदा 'इराणला मिळवणे कठीण जाईल'.
ही परवानगी फक्त आधीच प्रवासात असलेल्या तेलापुरती मर्यादित आहे आणि त्यातून नवी खरेदी किंवा उत्पादन करण्यास परवानगी मिळत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
'थोडक्यात, किंमत खाली ठेवण्यासाठी आपण तेहरानविरुद्ध इराणी तेलाचाच वापर करणार आहोत,' असेही बेसेंट म्हणाले.
युद्ध सुरू झाल्यापासून, आणि इराणच्या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील ऊर्जा पायाभूत संरचना बाधित झाल्यानंतर, तेल आणि गॅसचे दर झपाट्याने वाढले आहेत.
ब्रेंट क्रूड तेलाचा भाव सध्या प्रति बॅरल सुमारे 112 डॉलर्सवर स्थिर आहे. शुक्रवारी यात 3% वाढ झाली आणि गेल्या वर्षभरात 53% वाढ झालेली दिसते.
होर्मुझची सामुद्रधुनी नेमकी आहे कुठे?पर्शिया अर्थात इराणच्या आखातात (Persian Gulf) शिरण्याचा हा मुख्य मार्ग आहे.
या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या उत्तरेला आहे इराण, तर दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी पर्शियाच्या आखाताला ओमानच्या आखाताशी जोडते. इथल्या निसर्गरम्य होर्मुझ बेटावरून तिला हे नाव पडलं आहे.
हा जलमार्ग आकारानं लहान असला, तरी हा जगातला सर्वात महत्त्वाचा जहाजांसाठीचा जलमार्ग आहे.
या जलमार्गाची लांबी आहे साधारण 96 मैल म्हणजे 154.497 किलोमीटर आहे. तुलना करायची झाली, तर मुंबई ते पुणे हे अंतर आहे 152 किमी.
आणि सर्वात चिंचोळ्या भागामध्ये हा जलमार्ग फक्त 21 मैल म्हणजे 33.7962 किमी रुंद आहे.
BBC
याच्या प्रत्येक बाजूच्या शिपींग लेन्स फक्त 2 मैल म्हणजे 3.21 किमी रुंद आहेत.
हा मार्ग लहानसा, चिंचोळा असला तरी यातून जगातले सर्वात मोठे क्रूड ऑईल टँकर्स जाऊ शकतील, इतपत खोल आहे आणि मिडल ईस्ट म्हणजे मध्य-पूर्व अर्थात पश्चिम आशियामधले बहुतेक तेल आणि गॅस उत्पादक आणि त्यांचे ग्राहक या सामुद्रधुनीचा वापर करतात.
कोणत्याही वेळी काही डझन ऑईल टँकर्स या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दिशेने जात असतात किंवा त्यातून बाहेर पडत असतात.
गेल्यावर्षी जगभरातल्या एकूण क्रूड ऑईलपैकी 20% म्हणजे दररोज सुमारे 2.1 कोटी बॅरल तेल या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गेलं होतं.
हिंद महासागर (Indian Ocean) मधला महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय जलमार्ग असणारा मलाक्काची सामुद्रधुनी (Strait of Malacca), सुएझ कालवा, लाल समुद्रातली बाब एल्- मांदेब सामुद्रधुनी हे इतर मोठे जलमार्ग आहेत, पण होर्मुझची सामुद्रधुनी हा तेलासाठीचा 'World's Busiest Sea Route' आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी किती महत्त्वाची?होर्मुझची सामुद्रधुनी ही गल्फ भागातल्या तेल निर्यातदारांसाठी महत्त्वाची आहे. कारण या देशांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच तेल आणि गॅस उत्पादनावर आधारित आहे.
सौदी अरेबियाने 2018 साली या सामुद्रधुनीतून दररोज 64 लाख बॅरल्स तेलाची वाहतूक केली होती, तर इराकने 34 लाख, UAE ने 27 लाख आणि कुवेतने दररोज 20 लाखापेक्षा अधिक बॅरल्स तेलाची वाहतूक केली होती.
इराणही याच सामुद्रधुनीवर तेल निर्यातीसाठी अवलंबून आहे.
Liquefied Natural Gas (LNG) चा जगातला सर्वात मोठा उत्पादक असणारा कतारही जवळपास सगळ्या गॅसची निर्यात याच मार्गाने करतो.
गेल्या काही वर्षांमध्ये आशियातल्या बहुतेक सगळ्या अर्थव्यवस्थांसाठी हा मार्ग महत्त्वाचा झालाय.
भारत, चीन, जपान, दक्षिण कोरियापर्यंत पोहोचणारं बहुतेक क्रूड तेल याच मार्गाने येतं. अमेरिकाही याच मार्गाने तेल आयात करते.
युकेही या मार्गाने आखाती भागातून काही प्रमाणात तेल आणि LNG ची आयात करतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)