लोकसहभागातून शंकरपाडा शाळेचा कायापालट
esakal March 22, 2026 02:45 AM

शंकरपाडा शाळेच्या नव्या इमारतीचे आज लोकार्पण

कासा, ता. २१ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील अतिदुर्गम शंकरपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेचा लोकसहभागातून कायापालट करण्यात आला आहे. या नव्याने उभारलेल्या सुसज्ज शाळा इमारतीचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा रविवार (ता. २२) दुपारी १२ वाजता होणार आहे. या सोहळ्यास डहाणूचे आमदार विनोद निकोले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी मनोज रानडे असून, प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मतेकर, पल्लवी सस्ते तसेच गटविकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
शंकरपाडा येथील ही जिल्हा परिषद शाळा काही वर्षांपूर्वी जीर्ण अवस्थेत होती. अपुरी पायाभूत सुविधा, मर्यादित वर्गखोल्या आणि कमी विद्यार्थीसंख्या अशा अडचणींना शाळेला सामोरे जावे लागत होते. मात्र ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नातून तसेच प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली या शाळेचा आमूलाग्र बदल घडवून आणण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत डॉ. प्रतिमा कोडकणी, संदीप परीख व त्यांच्या परिवाराचे तसेच आनंदा केअर आणि दुहिता फाउंडेशनचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या देणगीतून नव्या इमारतीची उभारणी करण्यात आली असून, शाळेला आधुनिक आणि सुसज्ज स्वरूप प्राप्त झाले आहे.
अवघ्या चार वर्षांत लोकसहभागाच्या बळावर उभी राहिलेली ही शाळा आकर्षक व सुविधा संपन्न बनली आहे. विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार, आधुनिक आणि भविष्यवेधी शिक्षणाची संकल्पना येथे राबविण्यात येत आहे. परिणामी पालक व विद्यार्थ्यांचा शाळेकडे ओढा वाढला असून, शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
पूर्वी केवळ ३० ते ३५ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित असलेली ही शाळा आज सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. मराठी शाळा बंद पडण्याच्या पार्श्वभूमीवर शंकरपाडा शाळेची ही झपाट्याने झालेली प्रगती प्रेरणादायी ठरत आहे. जिद्द, चिकाटी आणि लोकसहभाग असेल, तर जिल्हा परिषद शाळाही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या होऊ शकतात, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.