>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
स्त्रीच्या जगण्यातील प्रखर वास्तवाचा विचार धाडसाने मांडणाऱ्या कमलाबाई टिळक. सुधारकी विचारांची, स्वत:कडे वस्तुनिष्ठपणे बघणारी, पारखणारी स्त्री त्यांच्या लेखनात दिसते.
मागच्या लेखात आपण विभावरी शिरुरकर या बंडखोर लेखिकेच्या तितक्याच बंडखोर लेखनाचा परामर्श घेतला. विभावरींच्या समकालीन अशा आणखी एका लेखिकेबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या लेखात. कमलाबाई टिळक हे त्यांचं नाव. कमलाबाई एका शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. स्वत आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होत्या. त्यामुळे स्त्रीला किती आश्वस्त वाटते, याचा अनुभव त्यांनी घेतला होता. अत्यंत डोळसपणे समाजात वावरताना त्यांनी स्त्री मनाची जी स्पंदने टिपली त्यांना आधुनिक मानसशास्त्राची जोड देत आपल्या कथांतून स्त्राrच्या मानसिक-भावनिक बाजूंवर प्रकाश टाकला. नवकथेची सुरुवात होण्याआधीच कमलाबाईंच्या कथेत पात्रांच्या मानसिकतेचा विचार आलेला दिसतो. एकीकडे स्त्राrच्या सामाजिक प्रश्नांचा अत्यंत निर्भीड विचार त्यांनी मांडला आहे आणि त्याच वेळी तिच्या अंतर्मनातील उलाघालींचा वेध घेतला आहे.
‘हृदयशारदा’ हा त्यांचा पहिला संग्रह 1932 मध्ये प्रकाशित झाला आणि नंतर ‘आकाशगंगा’ 1944 मध्ये. ‘प्रेमाचा वाटा’ नावाच्या त्यांच्या कथेचा मुद्दाम उल्लेख करायचा आहे. या कथेत त्यांनी एका स्त्राrला जर दोन पुरुष आवडत असतील आणि हवेसे वाटत असतील, तर… असा विचार मांडला आहे. त्या काळाचा विचार करता ही मांडणी धक्कादायक होती. स्त्राrचं पातिव्रत्य आणि निष्ठा यांवर उभ्या असलेल्या कुटुंबसंस्थेला न पचणारा हा विचार होता. लक्षात हे घ्यायला हवं की, याच काळात अनेक विद्वान पुरुषांनी बौद्धिक सहवास हवासा वाटतो या कारणासाठी प्रथम पत्नीचा त्याग करून सुशिक्षित तरुणींशी दुसरे लग्न करण्याचा पायंडा पाडला होता. द्विभार्या प्रतिबंधक कायदा आला 1955 मध्ये. त्यापूर्वी समाजात प्रतिष्ठित पुरुषांनी केलेल्या अशा दुसऱ्या विवाहाची अनेक उदाहरणे होती. कमलाबाई टिळकांच्या या कथेतील निर्मला विवाहित आहे. नंतर दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडलेली आहे. तिच्यापुढे पेच आहे की, आता यापैकी कोणाला जवळ करावे. पतीला आत्मसमर्पण करावे की आपल्यावर जो प्रेम करतो त्यावर स्वामित्त्व गाजवावे, या प्रकारचा प्रश्न तिला पडतो. तेव्हाही हा प्रश्न कठीण होता आणि आजही आहे. परंपरेने आखून दिलेल्या मार्गाने क्रमण करताना मनात उद्भवणाऱ्या या प्रकारच्या प्रश्नांची तड कशी लावायची… हा तो पेच आहे. अशा प्रश्नांना सोपी, समाजमान्य उत्तरे नसतात, पण असे पेच पडतात हे प्रथमच कथेमधून पुढे आलं. तेही एका स्त्रीच्या कथेमधून!
आई या संकल्पनेविषयीदेखील कमलाबाईंनी मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘आई’ या कथेत त्यांनी पिलांना पंखाखाली घेऊन त्यांना उब देणारी आई श्रेष्ठ की त्यांना वेळीच दूर करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अर्थार्जन करायला बाहेर पडणारी आई श्रेष्ठ, असे मूल्यविषयक प्रश्न पडलेली आई रंगवली आहे. ‘सगुणा’ या कथेत त्यांनी मृत पतीच्या आठवणींशी एकनिष्ठ राहून हालात दिवस काढणे श्रेयस्कर की दुसरा विवाह करून लहान मुलांचे संगोपन करण्याचा मार्ग श्रेयस्कर, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
स्त्राrच्या जगण्यातील प्रखर वास्तवाचा हा विचार कमलाबाई टिळकांनी फार धाडसाने मांडला आहे. मात्र तो मांडताना त्यांनी कोणताही आदेशात्मक निर्णय दिलेला नाही, हे विशेष. दोन्ही बाजू समोर मांडून वाचकाला विचार प्रवृत्त करायला लावण्याची पद्धत त्यांनी स्वीकारली आहे.
आदर्श पत्नीत्व आणि आदर्श मातृत्व म्हणजे काय, याचा शोध त्यांनी घेतलेला दिसतो. आदर्श आणि व्यवहार यांची सांगड घालता येईल काय, असाही विचार त्यामागे आहे. पदवी घेतलेल्या, सुशिक्षित स्त्रीच्या मनातली नाजूक घालमेल त्यांनी फार आस्थेने चित्रित केली आहे, जी त्यांच्यापूर्वी कोणी केलेली नाही.
स्त्रियांचं लेखन हे नेहमीच स्त्राrजीवनाशी समांतर राहिलेलं आहे. त्यामुळेच समाजात स्त्राrची रूपं बदलत गेली, तिच्या प्रश्नांचं स्वरूप बदलत गेलं तशी लेखनातली स्त्रीची कशी प्रतिमा बदलत गेली, हे इथे दिसतं.
स्वतला पारखण्याची, स्वतकडे वस्तुनिष्ठपणे बघण्याची क्षमता स्त्री अशी मिळवू लागली, तेही यातून दिसतं. स्वतला प्रश्न विचारणं, तर कधी आपले प्रश्न चर्चेसाठी ठेवणं, अशा समाजाभिमुख मार्गांचा अवलंब स्त्री करू लागली, हे महत्त्वाचं.
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)
[email protected]