>> डॉ मीनाक्षी पाटील
जगातील विविध भाषांचे स्वतचे असे नियम व भाषिक संकेत आहेत. मानवी संस्कृतीच्या विकसनात भाषा ही एक सांस्कृतिक व्यवस्था म्हणून कायमच निर्णायक ठरली आहे. अशा भाषा या माध्यमाद्वारे, साधनाद्वारे केलेली जीवनानुभवाची नावीन्यपूर्ण अशी चैतन्यपूर्ण रचना म्हणजे साहित्य निर्मिती. या साहित्य निर्मितीत भाषेचे उपयोजन करताना रसशास्त्रात विविध संकल्पनांचा विचार केला गेला आहे.
आपल्या या लेखमालेतून आपण वेगवेगळ्या माध्यम द्रव्यांतून आकाराला येणाऱया विविध कला व त्या कलांमधून व्यक्त होणाऱया दृश्य-अदृश्याचा खेळ समजून घेणार आहोत. हे दृश्य-अदृश्याचं नाटय़ समजून घेताना त्या त्या कलेतील निर्मिती प्रक्रिया व आस्वाद प्रक्रिया याविषयीपण ओघाने चर्चा करणार आहोत. प्रत्येक कलेची स्वतची अशी एक आविष्काराची स्वतंत्र चिन्ह व्यवस्था असते, भाषा असते आणि त्यानुसार कलाकृती आकार घेताना दिसते. मूलत कलाविचार करताना आपण जेव्हा ‘कलाकृती’ असा शब्दप्रयोग करतो त्या वेळी आपल्याला चित्र, शिल्प, नृत्य, संगीत किंवा साहित्यकृती यांसारखी एखादी इंद्रियगोचर किंवा मनोग्राह्य गोष्ट अभिप्रेत असते.
प्रत्येक कलेचे माध्यम द्रव्य वेगवेगळे असते व त्यामुळे प्रत्यक्ष कलाकृतीतही ते वेगळेपण अनुभवायला येते. विविध कलांमध्ये वापरल्या जाणाऱया माध्यम द्रव्यांमध्ये काळाच्या ओघात बरेच बदल होत आले आहेत. अगदी भाषा या माध्यमाचा जर विचार केला तर असे दिसून येते की, काळाच्या ओघात निसर्गाशी वाद-संवाद साधतच माणसांची भाषा आकाराला आली आहे, किंबहुना मानवी संस्कृतीच्या विकसनात भाषा ही एक सांस्कृतिक व्यवस्था म्हणून कायमच निर्णायक ठरली आहे. अशा या भाषेची एक चिन्ह व्यवस्था असून अक्षरे, शब्द, व्याकरणादी नियम व्यवस्थेतून भाषिक व्यवहार आकाराला येतो. जगातील विविध भाषांचे स्वतचे असे नियम व भाषिक संकेत आहेत. दैनंदिन जगण्यात आपण सारे जण संवादासाठी भाषा या माध्यमाचा अगदी सहजतेने वापर करीत असतो. आपापल्या प्रदेशातील भाषेच्या नियम, संकेतानुसार आपण बोलत असतो. भाषेचे हे नियम किंवा संकेत तसे अमूर्त असले तरी आपल्या सामाजिक व्यवहारात आपण संभाषण, लेखन यासाठी भाषेचा वापर करीत असतो.
भाषेच्या उक्रांतीचा विचार केला तर असे दिसून येते की, ती काळाच्या ओघात केवळ ‘संवाद साधणे’ एवढय़ापुरतीच मर्यादित न राहता तिची वाटचाल एका अमूर्ताच्या प्रदेशाकडेही झालेली आहे. एक कल्पित असे विश्व निर्माण करण्याची ताकद भाषेमध्ये आहे. अगदी प्राचीन काळापासून माणसे एकमेकांना गोष्टी सांगत आले आहेत. ‘गोष्ट’ किंवा ‘कथा’ हा एक ललित साहित्याचाच प्रकार आहे आणि सर्व ललित साहित्याच्या अभिव्यक्तीचे भाषा हे एक मुख्य माध्यम आहे. चित्र, शिल्प, नृत्य, नाटय़ आदी कलांचा अनुभव हा दृश्यमान असतो, तर साहित्यकलेचे माध्यम भाषा हे असल्याने साहित्यकृतीतील शब्दांतून व्यक्त होणाऱया वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व व्यंग्यार्थ यातून आपल्याला शब्दानुभूती येते. याबरोबरच साहित्यकृतीतील शब्दांद्वारे आपल्या अनेक संवेदनांनाही आवाहन केलेले असते. अशा प्रकारे विविध भाषिक घटकांच्या संघटनेतून साहित्यकृतीचे रूप आकाराला येते. थोडक्यात भाषा या माध्यमाद्वारे, साधनाद्वारे केलेली जीवनानुभवाची नावीन्यपूर्ण अशी चैतन्यपूर्ण रचना म्हणजे साहित्य निर्मिती होय.
भारतीय साहित्यशास्त्रात तसेच पाश्चिमात्य साहित्यशास्त्रात माध्यम आणि भावनाशय, सर्जन आणि आस्वाद याविषयी विपुल चर्चा झालेली आहे. भावभावनांच्या अभिव्यक्तीसाठी माध्यमाची नितांत आवश्यकता असते. साहित्यकलेचा विचार केला तर त्यात अभिव्यक्तीचे माध्यम भाषा असते. साहित्यातील भाषेतून भावनाशयाची अभिव्यक्ती होते. दैनंदिन व्यवहारात आपण जी भाषा वापरतो त्यापेक्षा वेगळे असे भाषेचे रूप साहित्य व्यवहारात वापरले जाते. महाकाव्य, भावकाव्य, नाटक, कादंबरी, कथा अशा विविध साहित्य प्रकारांतून भाषेचे वेगवेगळ्या प्रकारे उपयोजन केले जाते. भाषेच्या या वेगळ्या उपयोजनाचा विचार करताना रसशास्त्रात वक्रोक्ती, रीती, व्यंजना, ध्वनी इ. संकल्पनांचा विचार झालेला आहे.
भारतीय साहित्य विचारात नाटय़शास्त्रकार भरताप्रमाणेच आनंदवर्धन, अभिनवगुप्त किंवा नंतरच्या कालखंडात जगन्नाथपंडित आदींनी रसविचारावर विपुल अशी तात्त्विक चर्चा केली आहे. कोणत्याही कलानुभवात भावनाशयाच्या अभिव्यक्तीसाठी माध्यमाची आवश्यकता असते व त्यातूनच समग्र कलाकृती सिद्ध होत असते हा मुद्दा आनंदवर्धनाने फार महत्त्वाचा मानलेला दिसतो. याबरोबरच माध्यम आणि आशय यांच्या एकरूपतेवरच कलाकृतीचा खरा अर्थ सामावलेला असतो, किंबहुना माध्यमातूनच आशय विनासायास अभिव्यक्त होणे कलानुभवासाठी आवश्यक असते याचेही नेमके भान त्याच्या विचारात दिसते. असा आशय आणि अभिव्यक्तीच्या एकात्म आकृतीमधून अभिव्यक्त होणारा अर्थ हा दैनंदिन भाषेतील अर्थापेक्षा वेगळा असा सौंदर्यपूर्ण काव्यार्थ असतो. ज्यासाठी आनंदवर्धनाने ‘प्रतियमान अर्थ’ अशी संज्ञा वापरली आहे. त्याच्या मते भाषेच्या माध्यमातूनच काव्यानुभवाची परिपूर्ण अशी आकृती सिद्ध होत असते.
साहित्यकलेतील काव्य हे भाषा या द्रव्यातून शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होत असते. प्रचलित भाषेतूनच कवी आपल्या भावनांच्या आविष्कारासाठी पूर्णपणे नवीन अशा शब्दबंधांची निर्मिती करतो. कवी आपल्या कल्पकदृष्टीने सभोवतालच्या वास्तवाचे विविध पदर जसे पाहतो तसेच काही वेळा त्याच वास्तवाच्या पलीकडचेही अदृश्य असे असंख्य आकार तो पाहू शकतो. कवीभोवतीची स्थलकाल परिस्थिती त्याला घडवते, प्रेरणा देते. याबरोबरच तिच्या संस्कारातून तोही त्या भवतालाचे अन्वयार्थ लावत आपली प्रातिभ निर्मिती करीत असतो.
अशा रीतीने आपल्या भवतालाला, परंपरेला कधी आत्मसात करीत, तर कधी तिची मोडतोड करीत. कवी सातत्याने पुनर्रचना करीत असतो. या एकूणच काव्य निर्मिती प्रक्रियेत कवी शब्दांच्या दृश्य-अदृश्य रूपांशी, भावाशयाशी कसा लपंडाव खेळतो ते पाहू या पुढील लेखात!
(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव,
कवयित्री, चित्रकार आहेत.)
[email protected]