ICC Players of the Month: भारत पाकिस्तान खेळाडूंचा पुरस्काराने सन्मान, अशी होती कामगिरी
GH News March 23, 2026 06:13 PM

ICC Players of the Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीकडून दर महिन्याला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला जातो. फेब्रुवारी 2026 या महिन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा गौवर करण्यात आला. त्यांना आयसीसी प्लेयर ऑफ द मंथच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी हा पुरस्कार भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या खेळाडूंना मिळाला आहे. पुरूष क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा सलामीवर साहिबजादा फरहान याला गौरविण्यात आलं आहे. त्याने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीपर्यंत सर्वाधिक धावा केल्या. तर महिला क्रिकेटमध्ये भारताच्या अरूंधती रेड्डीला पुरस्कार मिळाला. उजव्या हाताची वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीने फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळलेल्या टी20 मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती.

साहिबजादा फरहानची अशी होती कामगिरी

पाकिस्तानचा ओपनर साहिबजादा फरहानची बॅट मागच्या महिन्यात चांगलीच तळपली. त्याने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. त्याने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सहा सामन्यात 76.6 च्या सरासरीने 383 धावा केल्या. विशेष म्हणजे फरहानने यावेळी दोन शतकं ठोकली. त्याने एकूण 18 षटकार आणि 37 चौकार मारले. साहिबजादाचा स्ट्राईक रेटही 160 पेक्षा जास्त होता.

अरूंधती रेड्डीला म्हणून मिळाला पुरस्कार

अरूंधती रेड्डीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. तिच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करता आली. टी20 मालिकेत तिची गोलंदाजी प्रभावी ठरली. टी20 मालिकेतील तीन सामन्यात तिने 8 विकेट घेतल्या. इतकंच काय तर सिडनीत 4 षटकात फक्त 22 धावा देत 4 गडी बाद केले. तर कॅनबरा टी20 सामन्यात 2 आणि एडिलेट टी20 सामन्यात 2 विकेट घेतले होते.

प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारावर भारताचं वर्चस्व

आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचे सर्वाधिक पुरस्कार जिंकण्याचा मान शुबमन गिलच्या नावावर आहे. त्याने चार वेळा या पुरस्काराला गवसणी घातली ठआहे. शुबमन गिलने जानेवारी 2023, सप्टेंबर 2023, फेब्रुवारी 2025 आणि जुलै 2025 रोजी हा पुरस्कार मिळवला होता. तर जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यरने प्रत्येकी दोन वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमने तीन वेळा या पुरस्काराला गवसणी घातली आहे. हॅरी ब्रूक आणि कामिंदु मेंडिस यांनी 2-2 वेळा पुरस्कार मिळवला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.