Ashok Kharat Nashik Crime: नाशिकमध्ये अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणानंतर सोशल मीडियावर (Social Media) पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी (Nashik Cyber Police) कडक भूमिका घेतली आहे. पीडित महिलांची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. (Nashik Crime News)
या प्रकरणानंतर अनेक फोटो सोशल मीडियावर मॉर्फ करून तसेच AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनावट स्वरूपात व्हायरल केले जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक सायबर पोलिसांनी अशा सर्व आक्षेपार्ह पोस्ट्सवर बारकाईने लक्ष ठेवले असून, संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, पीडित महिलांसोबत इतर संबंधित महिलांचेही फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे निरपराध महिलांचीही बदनामी होत असल्याने पोलिसांनी अशा प्रकारांना गांभीर्याने घेतले आहे.
कोणत्याही प्रकारे बदनामीकारक मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर थेट गुन्हा नोंदवला जाणार आहे. दरम्यान, पीडित आणि तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा, चुकीची माहिती आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्सवरही लक्ष ठेवण्यात येत आहे, जेणेकरून प्रकरणाची संवेदनशीलता कायम राहील. एकूणच, अशोक खरात प्रकरणात आता तपासाबरोबरच सोशल मीडिया मॉनिटरिंगलाही प्राधान्य देण्यात येत असून, पीडित महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी पोलिसांकडून ठोस पावले उचलली जात आहेत.
दरम्यान, अशोक खरातची आज सोमवारी (दि. 23) पुन्हा एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. गेल्या दोन तासापासून अशोक खरातची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष तपास पथकाच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते या स्वतः खरातची चौकशी करत असल्याची माहिती आहे. नाशिक क्राईम ब्रँचकडून खरातची काल रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली होती. यानंतर त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आता पर्यंत अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. अशोक खरातचे काळे कारनामे उघडकीस आणण्यासाठी विशेष तपास पथक आणि नाशिक क्राईम ब्रँचकडून सखोल तपास केला जात आहे.
आणखी वाचा