Pali News : इंधन टंचाईचा निसर्गाला फटका; जंगलात व माळरानात लाकूडफाट्यासाठी नागरिकांची वणवण
esakal March 23, 2026 09:45 PM

पाली - इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता रायगडच्या ग्रामीण आणि निमशहरी भागातील स्वयंपाकघरांवर दिसू लागला आहे. व्यापारी गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने आणि घरगुती गॅसची उपलब्धता कमी झाल्याने नागरिकांना पुन्हा एकदा पारंपरिक चुलींकडे वळावे लागत आहे.

मात्र, या 'अघोषित' इंधन टंचाईमुळे रायगडच्या समृद्ध वनसंपदेचा ऱ्हास होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शिवाय सध्या लाकूडफाट्याचे भाव देखील वाढले आहेत.

रायगड जिल्हा हा आपल्या वनसंपदेसाठी आणि जैवविविधतेसाठी ओळखला जातो. मात्र, गॅसअभावी हॉटेल व्यावसायिक आणि सामान्य गृहिणींना आता लाकूडफाट्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कडाक्याच्या उन्हात लाकूड गोळा करण्यासाठी महिला व पुरुषांना तसेच वृद्ध आणि लहानग्यांना देखील जंगलात रानोमाळ भटकावे लागत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे.

केवळ पर्यावरणाचा ऱ्हासच नव्हे, तर चुलीच्या धुरामुळे मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. तासनतास धुराच्या सानिध्यात राहिल्याने डोळ्यांचे विकार, श्वसनाचे त्रास आणि फुफ्फुसाचे आजार बळावण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिला या धुराच्या थेट संपर्कात येत असल्याने त्यांच्या आरोग्यासाठी हा मोठा धोका मानला जात आहे.

मुळातच हवामान बदलाचे संकट समोर असताना, इंधन टंचाईमुळे पुन्हा लाकूड फाट्याकडे वळणे हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. जंगलतोडीमुळे केवळ झाडे कमी होत नाहीत, तर त्यावर अवलंबून असणारी जैवविविधताही धोक्यात येते. प्रशासनाने इंधनाचा पर्यायी पुरवठा सुरळीत करणे आवश्यक आहे, अन्यथा वर्षानुवर्षे जपलेली वनसंपदा नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.

- शंतनू कुवेसकर, पर्यावरण अभ्यासक, माणगाव

निसर्गावर कुऱ्हाड जैवविविधता धोक्यात

रायगड जिल्हा हा वनसंपदेने नटलेला असला तरी सध्याच्या इंधन टंचाईमुळे या निसर्गावर अघोषित कुऱ्हाड चालवली जात आहे. जळाऊ लाकडासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने वनक्षेत्राचे प्रमाण वेगाने घटण्याची शक्यता आहे.

याचा थेट परिणाम जंगलातील पक्ष्यांच्या घरट्यांवर व वन्यजीवांच्या अधिवासावर आणि अन्नावर होऊन निसर्गाचे संतुलन बिघडण्याची शक्यता वर्तवली आहे. झाडांची संख्या कमी झाल्यामुळे उन्हाची तीव्रता वाढून भविष्यात पाणी टंचाई आणि तापमानातील वाढ असे गंभीर चटके सहन करावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

गॅस मिळेना आणि धूर सोसवेना

पालीतील लता माळी या गृहिणीने सांगितले की इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव अनेक गृहिणींना भरउन्हात लाकडे गोळा करण्यासाठी वणवण करावी लागत आहे. चुलीवर स्वयंपाक करताना निघणाऱ्या धुरामुळे डोळ्यांचे विकार आणि श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत.

लाकूडफाटा महागला

दुसरीकडे, व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल चालवणे कठीण झाले असून चुलीवर जेवण बनवताना वेळ आणि श्रम दोन्ही वाया जात आहेत. लाकूड फाट्याचे भावही वधारल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. याशिवाय लाकूड फाटा विक्रेत्यांना आता सुगीचे दिवस आले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.