टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली असून जेतेपदावर नाव कोरलं. आता टीम इंडियाने पुढचं लक्ष्य निश्चित केलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ कसा असेल याची आखणी आतापासूनच केली जात आहे. यासाठी भारतीय निवडकर्त्यांना 20 नावं ठरवली आहेत. या 20 खेळाडूंची चाचपणी आयपीएल 2026 स्पर्धेपासून होणार आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, निवडकर्ते या 20 खेळाडूंच्या कामगिरीवर आयपीएल दरम्यान लक्ष ठेवून असतील. या 20 खेळाडूंमध्ये 6 वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. ही स्पर्धा दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियात होणार आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांचं महत्त्व वाढलं आहे. पण सहा वेगवान गोलंदाजांमध्ये एक नाव नाही. मागच्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती.
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी निवडलेल्या सहा पैकी दोन वेगवान गोलंदाज तर कन्फर्म आहे. यात जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या दोघांचं नाव निश्चित आहे. तर अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज हे खेळाडू शर्यतीत आहे. त्याचबरोबर दुखापतग्रस्त असलेल्या हर्षित राणाचं नाव देखील या सहा गोलंदाजांमध्ये आहे. पण मागच्या वर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा आणि सर्वाधिक विकेट घेणारा मोहम्मद शमी मात्र यात नाही. म्हणजेच 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून त्याला डावललं जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. स्पर्धेसाठी अजून बराच अवधी शिल्लक असून निवडकर्त्यांनी खेळाडूंची नावं निश्चित केली आहेत. खेळाडूंची कामगिरी, फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंटवर आता निवडकर्ते लक्ष ठेवून असतील.
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी 20 खेळाडूंची नाव निश्चित असली तरी त्यापैकी 15 खेळाडू निवडले जाणार आहेत. त्यामुळे पाच खेळाडूंना बसावं लागणार आहे. 15 खेळाडूंमध्ये कर्णधार शुबमन गिल, उपकर्णधार श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा ही चार नावे 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत असेल. केएल राहुल, हार्दिक पांड्या यांची नावंही निश्चित मानली जात आहेत. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर ही नावं आघाडीवर आहेत. कुलदीप यादव, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, इशान किशन हे शर्यतीत आहेत. तर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनच्या नावाचा विचार केला जात आहे.