Bacchu Kadu : शेतकऱ्यांसाठी प्रहारचे प्रमुख बच्चू कडू पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. कांदा आणि मका उत्पादक शेतकरी सध्या संकटात आहेत. त्यांच्यासाठी बच्चू कडू यांनी नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या पुरणगावातून ट्रॅक्टर रॅली काढली. बच्चू कडू स्वतः ट्रॅक्टर चालवित यामध्ये सहभागी झाले होते. कांदा, मका तसेच शेतमालाच्या होणाऱ्या भाव घसरणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला आहे.
आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून जाब विचारणार आहे. येवल्याच्या पुरणगावातून प्रहार शेतकरी संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. स्वतः बच्चू कडू यांनी ट्रॅक्टर चालवत या रॅलीत सहभाग घेतला. मक्याचे ताट तसेच कांद्याच्या माळ्यांनी सजवलेले ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झाले होते. कांदा व मका भावांतर योजनेने खरेदी करा अन्यथा शेतकऱ्याला भगतसिंग व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा कडू यांनी दिला. शेतकरी हातात तलवारी घेऊन सरकारला धडा शिकवतील असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.
राज्य व केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, आत्महत्येवर बोलायला वेळ नाही, त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी रसातळाला चालल्याचे कडू म्हणाले. मात्र ज्यांना आठवे वेतन लागू झाले त्यांना या सरकारला कांदा स्वस्तात द्यायचा आहे. या भोंदू सरकारचे शेतकऱ्याविषयी असलेले धोरण चुकीचे आहे. त्यामुळं शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. या सरकारला गांधी मार्गाने दांडी यात्रा काढून आंदोलन करु असे कडू म्हणाले. वेळ पडल्यास अंगात भगतसिंग घालून हातात तलवार घेऊन हे सरकार कापून टाकू असा थेट इशारा प्रहारचे बच्चू कडू यांनी दिला.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी देखील बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. खरात याविषयी बोलतांना त्यांनी मीडियासह सरकारला धारेवर धरले. राजकीय नेत्यांसोबत कोणीही फोटो काढते म्हणजे त्याला जबाबदार राजकीय नेत्याला धरायचे कसे? असा उलट सवालही बच्चू कडू यांनी केला. बच्चू कडू यांनी येवल्यातील जन आक्रोश मोर्चात स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभाग नोंदवला, यावेळी ते बोलत होते.