मुंबई : या सरकारमध्ये मिंधेंच्या मंत्र्यांची किंमत काय हे समोर आलं आहे. त्यांच्या गटातील सगळे डरपोक असून भाजपकडून फाईली दाखवल्यावर ते शांत बसतात असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी लगावला. अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) उपमुख्यमंत्र्यांसह ज्यांचे ज्यांचे फोटो बाहेर आले आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन झालेल्या राड्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. मिंधे गटातील सर्वजण डरपोक आहेत. त्यांच्या फाईली दाखवल्यानतंर ते शांत बसतील. याचसाठी ते गुवाहाटीला गेले होते असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. या सरकारमध्ये मिंधेंच्या मंत्र्यांची इज्जत काय आहे हे समोर आलं आहे. कुणीही येतो आणि कुणाच्याही निलंबनाची मागणी करतोय, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना टोला लगावला.
अशोक खरात प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, भोंदू बाबा तर आहेतच, पण भोंदू भक्त आणि भोंदू मंत्र्यांवरही कारवाई केली पाहिजे. असे सगळे लोक सोबत घेऊन कारभार चालणार आहे का? उपमुख्यमंत्री वा कुणीही असोत, ज्यांचे ज्यांचे फोटो या प्रकरणात आले आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कॅपस्टीन फाईलमुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.
खरात प्रकरण आणि सातारा फाईल कुठून बाहेर येतात हे माहिती नाही. ते फोटो कुणी बाहेर काढलेत आणि कशासाठी काढलेत याचाही तपास व्हावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. खरात प्रकरणात कुणावर कारवाई होणार याकडे आमचं लक्ष आहे असंही ते म्हणाले.
अनेक शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरसाठी रांगा लागतात. त्यावेळी कोव्हिडसारखी तयारी ठेवा असं पंतप्रधान म्हणतात. त्यामुळे लोकांनी त्याचा नेमका काय अर्थ घ्यायचा असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला.
दरम्यान, बुवाबाजी करत खरातनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भोंदू अशोक खरातनं रबराचा नकली नाग आणि वाघाचं कातडं दाखवून अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली. खरात नाशिकच्या मीरपूर येथील ईशानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलावायचा. भक्तांना घाबरवून आणि अघोरी कृत्ये करुन खरात त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा.
धक्कादायक म्हणजे चिंचोका हे एखादं रत्न असल्याच्या भूलथापा मारत खरातनं हे कवडीमोल चिंचोके 1 लाखांना विकल्याचं समोर आलं. ही सर्व चक्रावून टाकणारी माहिती खरातच्या एका निटकवर्तीयाच्या एफआयआरमधून समोर आली.
ही बातमी वाचा :