डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला मनीषा जबाबदार नाही, सुसाईट नोट प्लांट केलेली; वकिलांचा युक्तिवाद, दोषमुक्तीच्या अर्जावरील अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, वाचा...
esakal March 24, 2026 03:45 AM

सोलापूर : येथील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंककर यांच्या आत्महत्येस कारणीभूत मनीषा मुसळे माने यांच्या दोषमुक्ती अर्जावरील युक्तिवाद सोमवारी (ता. २३) पूर्ण झाला. मनीषातर्फे ॲड. प्रशांत नवगिरे यांनी युक्तिवाद केला. डॉक्टरांच्या आत्महत्येला मनीषा जबाबदार नसून तिला गुन्ह्यातून दोषमुक्त करावे, असा युक्तिवाद त्यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या न्यायालयात केला. त्यावर आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

ॲड. नवगिरे यांनी युक्तिवाद केला की, ‘तथाकथित वादाची सुरुवात १७ एप्रिल २०२५ रोजी झाली. मनीषाने डॉ. शिरीष व त्यांच्या परिवारास ईमेल पाठवला. त्यात तिने त्यांच्यावर आरोप केले, पण डॉक्टरांची बदनामी होईल असे कोणतेही वाक्य त्यात नव्हते. ईमेल केवळ मनीषाने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाबद्दल मालकाकडे मांडलेली व्यथा होती. त्यातून मार्ग काढण्याची विनंती तिने केली होती. ईमेल मिळाल्यानंतर डॉक्टरांनी समजूतदारपणाने मनीषाला बोलावून तिची समजूत काढली. मनीषाने देखील डॉक्टरांची माफी मागून माफीनामा दिला. मनीषा जुनी कामगार असून ती आपल्या शब्दाबाहेर नाही असा डॉक्टरांना विश्वास होता. मनीषाचे देखील डॉक्टरांबद्दल आदराचे वागणे होते. त्यामुळे १७ एप्रिलला पाठवलेल्या ईमेलमुळे डॉक्टरांनी आत्महत्या करावी, असा मनीषाचा उद्देश दिसून येत नाही. तसेच डॉक्टरांनी आत्महत्या १८ एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास केली. तथाकथित माफीनाम्यानंतर २५ तासांनी डॉक्टरांनी आत्महत्या केली. यादरम्यान डॉक्टरांना पोलिसांत जाणे किंवा मनीषाला कामावरून काढण्याचे पर्याय उपलब्ध होते.

आत्महत्या हाच एकमेव पर्याय त्यांच्याकडे होता, असे म्हणता येणार नाही. सरकार पक्षाच्या कथनानुसार मृतदेहाच्या उत्तरीय चाचणीवेळी डॉक्टरांच्या कपड्यात सुसाईड नोट सापडली, परंतु कपडे जप्ती पंचनामा १९ एप्रिलला झाला. कपडे १८ एप्रिललाच पोलिसांनी जमा करून घेतले होते. उत्तरीय चाचणीवेळी मयताच्या अंगावर कपडे नव्हतेच. त्यामुळे सुसाईड नोट प्लांट केली असण्याची शक्यता दिसून येते. सुसाईड नोटचा संबंध मनीषाशी येत नाही. मनीषामुळे किंवा तिच्या कृत्यामुळे डॉक्टरांनी आत्महत्या केली, असा कुठलाही पुरावा दोषारोपत्रात नाही. तिच्याविरुद्ध दोषनिश्चिती करण्याइतपत पुरावा नसल्याने तिला दोषमुक्त करावे, असे मुद्दे ॲड. नवगिरे यांनी न्यायालयासमोर मांडले.

दोषमुक्तीचा अर्ज नामंजूर करावा; सरकार पक्षातर्फे युक्तिवाद

गुन्ह्यात सरकारतर्फे आनंद कुर्डूकर यांनी युक्तिवाद केला. गुन्ह्यातील मनीषा मुसळे मानेविरुद्ध थेट आरोप ‘एफआयआर’मध्ये नमूद आहेत. तिने पाठवलेल्या ईमेलमुळे डॉक्टरांनी आत्महत्या केली. सरकार पक्षाकडे मनीषाविरुद्ध पुरेसा पुरावा आहे. त्यामुळे तिचा अर्ज नामांजूर करावा, असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.