धक्कादायक! रिक्षातील गॅस संपला अन् नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी 'तो' गेला नाही; हिप्परगा तलावात दोघे बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरु
esakal March 24, 2026 03:45 AM

सोलापूर : उन्हाच्या तडाख्यात हिप्परगा तलावात पोहायला गेलेले दोन तरुण बुडाल्याची दुर्घटना सोमवारी (ता. २३) दुपारी चार-साडेचारच्या सुमारास समोर आली. त्यातील एकाचा मृतदेह सापडला, पण दुसरा तरुण अजून सापडलेला नाही. भारत शिवशंकर सुरवसे (वय २८, रा. जोशी गल्ली, शेळगी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मित्र गिरीश सुरेश माळगे (वय २९, रा. रामदेवनगर, शेळगी) याच्यासोबत भारत हिप्परगा तलावात पोहायला गेला होता. पण, दोघेही पाण्यातून बाहेर येताना बुडाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक तेथे दाखल झाले. परिसरातील लोकही जमा झाले होते. त्यांनी सोलापूर तालुका पोलिसांना खबर दिली. पोलिस अंमलदार अकबर शेख तेथे पोचले. त्यांनी तळे हिप्परगा गावचे पोलिस पाटील प्रदीप काळे व स्थानिक पोहणाऱ्या लोकांच्या मदतीने बुडालेल्या दोघांचा शोध घेतला.

त्यांनी अर्ध्या तासात भारतचा मृतदेह शोधून बाहेर काढला. पण, तलावाच्या काठावर कपडे, मोबाईल असलेला गिरीश सापडला नाही. तळे हिप्परगा तलावातील दोन टॉवरजवळ ही दुर्घटना घडली. गिरीशचा शोध सायंकाळी साडेसहा- पावणेसात वाजेपर्यंत घेतला पण तो सापडला नाही. आता उद्या (मंगळवारी) आणखी शोधमोहीम चालणार असल्याचे सोलापूर तालुका पोलिसांनी सांगितले.

रिक्षात गॅस नसल्याने ‘तो’ कार्यक्रमाला गेला नाही

मृत भारत सुरवसे याच्या भावकीतील एकाचे सांगोल्यात सोमवारी जावळ काढण्याचा कार्यक्रम होता. भारतच्या कुटुंबातील सगळेच तिकडे गेले होते. भारत देखील त्या कार्यक्रमासाठी जाणार होता, पण रिक्षातील गॅस संपला होता. त्याला गॅस न मिळाल्याने भारत कार्यक्रमाला जाऊ शकला नाही. त्यामुळे तो उन्हाळ्यात पहिल्यांदाच मित्रासोबत हिप्परगा तलावात पोहायला गेला होता आणि ही दुर्घटना घडली, असे नातेवाइकांनी सांगितले.

पुढच्या महिन्यात होणार होते लग्न

मृत भारत हा रिक्षा चालवत होता. त्याच्या कुटुंबात एक लहान भाऊ आणि आई-वडील आहेत. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी भारत याच्यावरच होती. त्याच्या लग्नाची बोलणी नुकतीच झाली होती. त्याच्या नात्यातील एका मुलीसोबत त्याचा विवाह जवळपास निश्चित झाला होता. पुढच्या महिन्यात त्यांचा विवाह करायचा, असे नियोजन नातेवाइकांनी केले होते, असेही नातेवाइकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.