Pune News : 'झेडपी'चे विद्यार्थी घेणार झेप; पंचवीस जणांना मिळणार युरोपियन स्पेस सेंटरला भेट देण्याची संधी
esakal March 24, 2026 03:45 AM

पुणे - इस्रो आणि नासा भेटीचा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आता आणखी मोठी झेप घेणार आहेत. पुढील वर्षात विद्यार्थ्यांना युरोपियन स्पेस सेंटरची भेट देण्याची संधी मिळणार आहे. बेल्जियममधील युरोपियन स्पेस सेंटरला २५ विद्यार्थी पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे यावर्षी परदेशातील अंतराळ संशोधन संस्थांना भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० वर जाणार आहे.

जिल्हा परिषदेकडून सध्याच्या शैक्षणिक वर्षात नासा आणि इस्रोला विद्यार्थी पाठविण्याचा पहिल्यांदाच उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी आंतरविद्यापीठीय खगोलविज्ञान व खगोलभौतिकीशास्त्र केंद्र (आयुका) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभ्यासक्रम तयार केला होता. या अभ्यासक्रमावर आधारित तीन टप्प्यांची निवड परीक्षा घेण्यात आली.

अंतिम टप्प्यात आयुका येथे विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ५० विद्यार्थ्यांना इस्रोच्या भेटीसाठी पाठविले होते, तर २५ विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा या संस्थेला भेट देण्याची संधी दिली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या संधीचे राज्यभर कौतुक झाले होते. इतर जिल्ह्यांनीही अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याची तयारी दर्शविली होती.

गतवर्षीच्या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे प्रशासनाचे निरीक्षण आहे. नासा व इस्रोला भेट देऊन आलेल्या विद्यार्थ्यांची विज्ञान विषयातील आवड वाढली असून, त्यांच्या अभ्यासाच्या गतीतही वाढ झाली आहे. हे विद्यार्थी सध्या आयुका संस्थेच्या संपर्कात असून, त्यांना पुढील मार्गदर्शन दिले जात आहे.

या पार्श्वभूमीवर यावर्षी उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इस्रो व नासाप्रमाणेच २५ विद्यार्थ्यांना बेल्जियममधील युरोपियन स्पेस सेंटरला पाठविण्यात येणार आहे. अंतराळ विज्ञानाचे प्रात्यक्षिक, रॉकेट व उपग्रह तंत्रज्ञानाची माहिती आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांना या भेटीत मिळणार आहे.

जिल्हा परिषदेने जाहीर केलेले वेळापत्रक

1) पहिली चाचणी : जून अखेर

पहिली परीक्षा जून महिन्याच्या अखेरीस घेण्यात येणार आहे. ही परीक्षा केंद्रशाळा स्तरावर होणार असून, बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपाची असेल.

2) दुसरी चाचणी : जुलै अखेर (ऑनलाइन)

पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत दुसरी चाचणी घेतली जाणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल.

3) तिसरी चाचणी : १५ ऑगस्टपूर्वी

यामध्ये आयुकाकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे.

युरोपियन स्पेस सेंटरची वैशिष्ट्ये

बेल्जियममधील ट्रान्सिन येथे असलेले युरोपियन स्पेस सेंटर हे युरोपमधील प्रमुख अंतराळ शिक्षण केंद्रांपैकी एक आहे. येथे विद्यार्थ्यांना रॉकेट, उपग्रह, अंतराळ मोहिमा आणि अंतराळवीर प्रशिक्षणाशी संबंधित प्रात्यक्षिके दाखविली जातात. अंतराळ विज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी हे केंद्र जगभरात प्रसिद्ध आहे.

इस्रो, नासा दौऱ्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पालकांनी या दौऱ्याचे कौतुक केले. त्याशिवाय राज्य शासनाने देखील या उपक्रमाची दखल घेतली आहे. यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. युरोपियन स्पेस सेंटरसाठी २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.