संगमनेरमध्ये पंचायत समिती कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; बाळासाहेब थोरातांच्या भावासह 10 जणांविरोधात गुन्हा
नितीन ओझा, एबीपी माझा March 24, 2026 01:13 PM

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) येथे पंचायत समिती कार्यालयात (Panchayat Samiti Office) घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तालुका अभियान व्यवस्थापकावर कार्यालयात घुसून काही जणांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्तींनी थेट पंचायत समिती कार्यालयात प्रवेश करत संबंधित अधिकाऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, घटनेच्या वेळी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Ahilyanagar Crime News: बाळासाहेब थोरातांच्या भावासह 10 जणांविरोधात गुन्हा

या प्रकरणी रात्री उशिरा संगमनेर शहर पोळी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद नाना थोरात यांच्यासह 9 ते 10 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शरद थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू असल्याची माहिती समोर आली आहे.

Ahilyanagar Crime News: पोलिसांकडून तपास सुरु

दरम्यान, मारहाणीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, सरकारी कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित झाला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Ahilyanagar Crime News: धक्का दिल्याच्या कारणावरुन खेडले परमानंद येथे तिघांना मारहाण

दरम्यान, सोनई जवळील खेडले परमानंद येथे नाचताना धक्का का दिला? या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 13 मार्च रोजी दुपारी 2 वा. खेडले परमानंद गावातील मारुती मंदिरासमोर फिर्यादी उभे असताना नाचताना धक्का का दिला? असे म्हणून शिवीगाळ करून हातातील गज व स्टीलच्या कड्याने डोक्यात व लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले व पुन्हा आमच्या नादी लागला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याची फिर्याद सुनिल ज्ञानदेव बर्डे (रा. शिरेगाव) यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिल्याने आर्यन बर्डे, शुभम बर्डे, आदित्य वैरागर (सर्व रा. खेडले परमानंद तालुका नेवासा) यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे. 

आणखी वाचा 

Ashok Kharat : तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतील ‘शक्तिवर्धक मध’, एक किलोची बाटली 9 लाखांना विकून भाविकांना गंडा; अशोक खरातचा आणखी एक कारनामा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.