मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवनाचा विस्तार! फडणवीस सरकारकडून ८ कोटींचा निधी
Tv9 Marathi March 24, 2026 06:45 PM

महाराष्ट्र आणि मॉरिशस या दोन्ही प्रदेशांमधील मैत्रीचे नाते पिढ्यानपिढ्यांचे असून सातासमुद्रापार राहूनही येथील मराठी जनसमुदायाने आपली सांस्कृतिक नाळ अतिशय अभिमानाने जपली आहे, असे गौरवोद्गार भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मॉरिशस येथे काढले. मॉरिशसमधील मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली. या निधीतून उभारल्या जाणाऱ्या विस्तारित वास्तूमुळे जागतिक स्तरावर मराठी अस्मिता अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

रविंद्र चव्हाण यांनी दोन दिवसीय मॉरिशस दौऱ्यात उच्चस्तरीय मान्यवरांच्या भेटीगाठी घेत भारत-मॉरिशस संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष धरमबीर गोखुल यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत भारत-मॉरिशस मैत्री, ब्ल्यू इकॉनॉमी, पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. “मॉरिशस हा भारताचा लहान भाऊ आहे,” असे सांगत राष्ट्राध्यक्षांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक केले.

याशिवाय मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री धनंजय रामफुल, आयटी व इनोव्हेशन मंत्री डॉ. अविनाश रामतोहूल आणि कला व सांस्कृतिक मंत्री महेंद्र गोंदीया यांच्यासोबतही महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात सहकार्य वाढवणे, सांस्कृतिक देवाण-घेवाण, वाचनालय उभारणी तसेच जागरी नृत्याच्या युनेस्को नामांकनासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

या दौऱ्याचा विशेष ठळक भाग म्हणजे मोका येथे “महाराष्ट्र भवन” विस्तारित वास्तूचा शिलान्यास सोहळा. या वास्तूतील सभागृहाला “स्वातंत्र्यवीर सावरकर” यांचे नाव देण्यास स्थानिक समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच मॉरिशसमधील विविध मराठी संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे अनुदानाचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यातील सांस्कृतिक व सामाजिक संबंध अधिक दृढ होत असून स्नेहबंधाचा नवा अध्याय लिहिला जात असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.