IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई
esakal March 24, 2026 11:45 PM

Ben Duckett Opts Out Of IPL 2026, Ban Looms: इंग्लंडचा स्टार फलंदाज बेन डकेट याने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. टेलेग्राफने दिलेल्या वृत्तानुसार डकेटने इंग्लंड क्रिकेटला महत्त्व देताना हा निर्णय घेतला. आयपीएल लिलावात डकेटला २ कोटींत DC ने आपल्या ताफ्यात घेतले होते. त्याला लोकेश राहुलसह सलामीला खेळवण्याचा विचार फ्रँचायझी करत होती. पण, आता हाती आलेल्या वृत्तानुसार त्याने यंदाच्या पर्वातूनच माघार घेतली आहे आणि त्यामुळे त्याच्यावर २०२९ पर्यंत आयपीएलमध्ये सहभाग घेण्याची बंदी घातली जाऊ शकते.

"हा निर्णय घेणे, माझ्यासाठी खूपच अवघड होते आणि मी यावर्षी आयपीएल खेळण्यास येत नसल्या कारणाने मी दिल्लीतील प्रत्येकाची माफी मागतो, " असे डकेटने टेलेग्राफ स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले. तो पुढे म्हणाला, "जेव्हा मी लिलावासाठी माझे नाव दिले, तेव्हाच मला जाणवले की ही एक सुवर्णसंधी ठरेल; 'दिल्ली'सारख्या फ्रँचायझीने माझी निवड करणे, ही तर एक अप्रतिम गोष्ट होती. मी पूर्णपणे भारावून गेलो होतो. जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश असलेली ही सर्वोत्तम स्पर्धा आहे आणि तिथे खेळणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला असता."

IPL 2026 Rule: आता 'चेंडू' अनफिट होणार, आयपीएल पाहताना मजा येणार! दुसऱ्या डावामध्ये कॅप्टन बॉल बदलण्याची मागणी करणार...

"मी आयपीएलमध्ये कधीच खेळलेलो नाही. कदाचित मी आता आयपीएलचा निरोप घेत आहे की काय, हे मला नक्की सांगता येत नाही. माझे वय पाहता, माझ्यासाठी हे थोडे कठीण असू शकते; तरीही, एक दिवस मला दिल्लीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे. मात्र, मी याविषयी खूप विचार केला आणि माझ्या कारकिर्दीच्या दृष्टीने हाच योग्य निर्णय आहे, याची मला खात्री आहे," असे त्याने पुढे नमूद केले.

डावखुऱ्या फलंदाजा डकेटने ॲशेस मालिकेत २०.२ च्या सरासरीने २२१ धावा केल्या होत्या. तो २०२६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात सहभागी होता, परंतु या स्पर्धेत त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. आयपीएलमधून अचानक माघार घेतल्याने त्याला नव्या नियमानुसार तीन वर्षांच्या बंदीच्या कारवाईचा सामना करावा लागू शकतो. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकलाही अशाच बंदीची शिक्षा झाली आहे.

IPL 2026 Marathi News: रवींद्र जडेजाचा 'तो' फोटो, साक्षीची Video शूटींग अन् MS Dhoni फक्त रडायचाच बाकी होता, Viral Moment

"मी चार वर्ष या क्षणाची पायाबांधणी करत होतो आणि हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम १२ महिने ठरले असते. ऑक्टोबरमध्ये माझे लग्न झाले; त्यानंतर ऑस्ट्रेलियात जाऊन 'ॲशेस' मालिका जिंकण्याची, वर्ल्ड कप खेळण्याची आणि तोही जिंकण्याची मी आशा बाळगली होती. लग्नाचा भाग तर पूर्ण झाला आहे आणि त्याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे! पण त्यानंतरचे काय? त्यानंतर मात्र परिस्थिती यापेक्षा अधिक वाईट होऊच शकली नसती."

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.