Karad News : ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार; कऱ्हाडात भरधाव कारने दोघांना उडवले, नागरिकांचा संताप
esakal March 25, 2026 03:45 AM

कऱ्हाड ः शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास ड्रंक अँड ड्राईव्ह थरार शहरवासीयांनी अनुभवला. शेवाळवाडी-उंडाळे येथील मद्यपी चालकाने भरगाव वेगात कार चालून माजी नगरसेवकासह दोघांना उडवले. नागरीकांनी पाठलाग करून व्हॅन अडवली. तसेच चालकाला बेदम चोप देत गाडी उलटवून तोडफोड केली. जखमी माजी नगरसेवकावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर जखमी महिलेवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिध्दार्थ महादेव थोरवडे (रा. बुधवार पेठ,कऱ्हाड) आणि सुरय्या इब्राहिम शिकलगार (रा. मंगळवार पेठ कऱ्हाड) अशी दोन्ही जखमींची नावे असुन अक्षय संभाजी शेवाळे (शेवाळेवाडी-उंडाळे) असे मद्यपी चालकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

पोलिसांची माहिती अशी ः काल रात्री साडेअकराच्या सुमास अक्षय शेवाळे त्याच्या ताब्यातील चारचाकी भारगाव वेगात मद्यधुंद अवस्थेत चालवत होता. यावेळी भरधाव वेगातील कारने बुधवार पेठ आणि मंगळवार पेठ परिसरात सिद्धार्थ थोरवडे आणि सुरय्या शिकलगार यांना जोरदार धडक दिली. सिद्धार्थ थोरवडे यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर शिकलगार यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन्ही जखमींना धडक देत अक्षय शेवाळे भरधाव वेगात कार चालवीत असल्याने परिसरातील नागरिकांनी व वाहन चालकांनी त्याचा पाठलाग केला. कार मंगळवार पेठ येथील कन्या शाळा परिसरात आल्यानंतर रस्त्यावरील दुभाजकावरून उडून पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी भेट परिस्थिती आटोक्यात आणली. दोन्ही जखमींचे प्रकृती स्थिर असून मद्यपी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सांगितले आहे.

जखमीला पाहताना नातेवाईकला अटॅक

अपघातातील एका जखमी व्यक्तीला पाहण्यासाठी एक नातेवाईक रुग्णालयात दाखल झाला होता. त्यावेळी संबंधित चर्चा छातीत अचानक दुखण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. त्यामुळे शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.