कऱ्हाड ः सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीदरम्यान उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड शहरामध्ये सर्वपक्षीय आक्रमक झाले असून, निवड प्रक्रिया रद्द करून ती नव्याने घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर येथील प्रीतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नूतन पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. त्यामुळे यशवंतराव स्मृतिस्थळ पवित्र करण्यासाठी उदया (बुधवारी) सकाळी गोमूत्र शिंपडण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले.
शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रीय काँग्रेस, तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आज एकत्र येत निषेध आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान पोलिसांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप करत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह १०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे निर्देश दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
या निर्देशानंतर राजकीय वातावरण अधिक तापले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी जोर धरत आहे. येथील दत्त चौकात आज दुपारी नगरसेवक विजयसिंह यादव, राजेंद्र माने, अखिल भरतील मराठा संघाचे अनिल घराळ, सचिन पाटील, मोहन कदम, कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष नामदेव पाटील, रुपेश मुळे, वैशाली जाधव, विनायक भोसले, विवेक कुराडे पाटील, रोहन विभुते आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. विविध पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी यावेळी निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उमेदवारांना मतदानाचा अधिकार असताना प्रशासनाने हस्तक्षेप करून तो हिरावून घेतला. संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर पद्धतीने पार पडली असून, ही निवड आम्हाला मान्य नाही, असा आरोप करत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक नव्याने घेण्याची मागणी करण्यात आली.
यशवंतराव स्मृतिस्थळ गोमूत्र शिंपडून पुन्हा पवित्र करणार
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर येथील प्रीतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नूतन पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केल्याचा मुद्दाही आंदोलनात उपस्थित करण्यात आला. या कृतीवर नाराजी व्यक्त करत स्मृतिस्थळ पवित्र करण्यासाठी उदया (बुधवारी) सकाळी गोमूत्र शिंपडुन पुन्हा पवित्र करण्यात येईल असे नगरसेवक विजयसिंह यादव यांनी सांगीतले.