शालेय पाठ्यपुस्तकात अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित धडा घ्यावा, आमदार राजकुमार बडोलेंची विधानसभेत मागणी
निलेश बुधावले, एबीपी माझा March 25, 2026 09:43 PM

मुंबई : शालेय पाठ्यपुस्तकात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित धडा घेण्याची आग्रही मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली आहे. अजित पवार यांचा प्रशासकीय दरारा, कामाचा धडाका आणि विकासाची दूरदृष्टी आता पुढच्या पिढीला अभ्यासता यावी, यासाठी त्यांच्या जीवनावर आधारीत एक विशेष धडा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत आज केली. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलताना आमदार राजकुमार बडोले यांनी ही महत्वपूर्ण मागणी केली. दरम्यान राजकुमार बडोले यांनी अजितदादा पवारांच्या कार्यशैलीचे विविध पैलू मांडत, हा विषय शिक्षण विभागाने गांभीर्याने घ्यावा असे आवाहनही केले.

आमदार बडोले यांनी सभागृहात अजितदादा पवारांच्या व्यक्तिमत्त्वातील अशा काही गुणांचा उल्लेख केला ज्यामध्ये दादांची ​शिस्त आणि वक्तशीरपणा, प्रशासकीय पकड आणि कठोर आर्थिक शिस्त जनता दरबार बांधकाम आणि गुणवत्ता पर्यावरण प्रेम तंत्रज्ञानाचा स्वीकार याचा समावेश असावा असे मांडले. अजितदादांची सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची पद्धत सर्वश्रुत आहे.पहाटे 5 वाजल्यापासून प्रशासकीय कामांचा निपटारा करणे आणि अधिकाऱ्यांना कामाला लावणे, हा त्यांचा 'ट्रेडमार्क' पॅटर्न होता. राज्याच्या तिजोरीचा कणा मानल्या जाणाऱ्या अर्थमंत्रालयावर त्यांची असलेली पकड आणि सरकारी निधीचा विनियोग करताना पाळली जाणारी कठोर आर्थिक शिस्त, हा अभ्यासाचा विषय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरु शकतो असेही राजकुमार बडोले म्हणाले.

अजितदादांचा ​जनता दरबार हा तर राज्यातील कुठल्याही नेत्यांचा नसेल इतका मोठा जनता दरबार होत होता. या दरबारात जनतेच्या समस्या थेट ऐकून घेऊन त्या जागेवर सोडवण्याची त्यांची पद्धत ही लोकशाहीतील जनसंवादाचा एक उत्तम नमुना होता. कोणतेही बांधकाम करताना ते दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याबाबत अजितदादा नेहमी आग्रही असायचे. केवळ काम पूर्ण करणे नाही, तर पुढील 50 वर्षांचा विचार करुन पायाभूत सुविधांची निर्मिती करणे आणि नंतर त्यांची योग्य देखभाल-दुरुस्ती करणे, यावर दादांचा भर असायचा. वृक्षारोपणाबद्दलची त्यांची ओढ हे त्यांच्या निसर्गप्रेमाचे दर्शन घडवत होते. आधुनिक जगाशी जुळवून घेताना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार प्रशासनात कसा करावा, याचे मार्गदर्शनही त्यांच्या कार्यातून पहायला मिळायचे हेही आवर्जून राजकुमार बडोले यांनी सभागृहात स्पष्ट केले.

राजकुमार ​बडोले यांनी यावेळी 'बारामती पॅटर्न' चा विशेष उल्लेख करताना बारामतीचा झालेला कायापालट, तेथील आधुनिक शेती, शिक्षण आणि उद्योग यामधील प्रगती हे अजितदादा पवारांच्या नियोजनाचे यश आहे. हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात कसा राबवता येईल, याचे धडे विद्यार्थ्यांना शाळेतच मिळावे, असा आग्रहही केला.

आमदार अमोल मिटकरी यांनी यापूर्वी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना पत्र लिहून अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारीत पाठ्यपुस्तकात धडा घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अजितदादांच्या कामात केवळ राजकारण नाही, तर समाजकारण आणि विकासाचा ध्यास होता. सर्वधर्मसमभावाचा विचार आणि जनतेशी असलेली बांधिलकी जपणारा हा नेता विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरू शकतो असे स्पष्ट मत आमदार राजकुमार बडोले यांनी सभागृहात मांडले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.