PMPML Journey : 'पीएमपीएमएल' प्रवाशांचा प्रवास आता 'हायटेक'
esakal March 27, 2026 03:45 AM

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) प्रशासनाने ऑनलाइन तिकीट विक्रीचे प्रमाण वाढविण्यासाठी व प्रवाशांचा प्रवास ‘हायटेक’ व्हावा, या करिता मोहीम आखली आहे. अधिकृत ‘आपली पीएमपीएमएल’ ॲपचे आतापर्यंत २४ लाख प्रवाशांनी मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे. ही संख्या ५० लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असून यासाठी एप्रिल महिन्यात विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

यात प्रवाशांमध्ये ॲपविषयी जाणीवजागृती करणे हे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. प्रवाशांना ॲप डाऊनलोड करणे सोपे जावे, यासाठी प्रशासन लवकरच याची कार्यपद्धती सांगणारे स्टिकर्स प्रसिद्ध करणार आहे. ते शहरातील प्रमुख बसथांबे, बसमधील आसनव्यवस्था आणि बसच्या दर्शनी भागावर लावले जातील. या स्टिकर्सवर ‘क्यूआर कोड’ असेल, जो स्कॅन करताच प्रवाशांना थेट ‘आपली पीएमपीएमएल’ ॲप डाऊनलोड करता येईल.

प्रवाशांसाठी हे फायद्याचे

  • बसची वाट पाहतानाच मोबाईलवर तिकीट काढता येईल.

  • तिकीट काढताना सुट्या पैशांवरून वाहकांशी होणारे वाद कमी होतील.

  • ॲपवर बसचे लोकेशन आणि वेळापत्रक पाहण्याची सुविधा.

  • प्रवाशांना बसची माहिती घेण्यासाठी नियंत्रकाकडे जाण्याची आवश्यकता नाही.

  • आपली बस कुठे आहे, याची माहिती मिळत असल्याने बसची वाट पाहण्याबाबतचा निर्णय प्रवाशांना घेता येईल.

आपली पीएमपीएमएल’ हे ॲप प्रवाशांसाठी खूप चांगले आहे. या वापरकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी मोहीम राबवली जाणार आहे. सध्या २४ लाख याचे वापरकर्ते आहेत, ती संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी या मोहिमेचे आयोजन केले आहे.

- महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.