PNG Gas Connection : 'पीएनजी'साठी यंत्रणा सज्ज; नवीन जोडणीचे काम हाती घेण्याचे 'एमएनजीएल'चे नियोजन
esakal March 27, 2026 03:45 AM

पुणे - अमेरिका-इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या झळा नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पाइपद्वारे नैसर्गिक गॅस (पीएनजी) नेटवर्क उपलब्ध असलेल्या ठिकाणी त्याची जोडणी घेणे अनिवार्य केले आहे. ‘एलपीजी’वरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशानेच हे आदेश दिले आहेत. येत्या काळात महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) मोठ्या प्रमाणात नवीन जोडणी देण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

पीएनजीचे उत्पादन देशांतर्गत होते आणि त्याचा मोठा साठादेखील आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने आणि १०० टक्के वितरण सध्या सुरू आहे. सोसायटीत पीएनजीची लाईन आहे, तेथील सदनिकाधारकाने जोडणी घेतल्यानंतर त्यांना दीड हजार रुपयांची सवलत दिली जाणार आहे. तसेच, नवीन भागात जोडणीची विनंती आल्यानंतर त्यांना लवकरात लवकर जोडणी दिली जाईल.

सध्या शहरातील बड्या सोसायटी, सर्वाधिक सोसायटी असलेल्या भाग आणि बैठी घरे असलेल्या भागातदेखील पीएनजी उपलब्ध आहे. तांत्रिक दृष्ट्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या सर्वच भागात अधिकाधिक जोडणी देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती ‘एमएनजीएल’कडून देण्यात आली.

सुसंगत नियमावली लागू

गॅस पाइपलाइन टाकणे, देखभाल, विस्तार आणि संबंधित सुविधा उभारणीसाठी एक सुसंगत नियमावली लागू करण्यात आली. त्यामुळे विनाअडथळा खोदकाम करता येणार आहे. पाइपलाइन टाकताना विविध परवानग्या, जास्त शुल्क आणि जमीन उपलब्धतेतील अडचणी यामुळे होणारा विरोध यामुळे प्रकल्पांमध्ये विलंब होत होता. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी नवीन नियमांत परवानगी प्रक्रिया सुलभ केली आहे. या आदेशानुसार सार्वजनिक, तसेच खासगी क्षेत्रातील संस्थांना ठराविक कालमर्यादेत पाइपलाइनसाठी परवानगी देणे बंधनकारक राहणार आहे.

‘या’ भागात पीएनजीचा पुरवठा

  • पुणे महापालिका

  • पिंपरी-चिंचवड महापालिका

  • चाकण

  • हिंजवडी

  • तळेगाव

‘एमएनजीएल’कडून गॅसपुरवठा

  • सीएनजी स्थानक - १२५ हून अधिक

  • घरगुती कनेक्शन - ८ लाखांपेक्षा जास्त

  • सीएनजी वाहने - पाच लाख ५० हजारांहून अधिक

पाइपलाइन गॅसचे फायदे

  • सतत आणि अखंड गॅस पुरवठा मिळतो

  • सिलिंडर संपण्याची किंवा उशीर होण्याची समस्या राहत नाही

  • सुरक्षितता अधिक असते, कारण गॅस गळतीची त्वरित माहिती देणारी यंत्रणा असते

  • खर्चाच्या दृष्टीने दीर्घकालीन फायदेशीर

  • वाहतूक व सिलिंडर बदलण्याचा अतिरिक्त खर्च टळतो

  • जागेची बचत होते, कारण सिलिंडर साठवण्याची गरज राहत नाही

  • जितका वापर, तितकाच खर्च

  • तुलनेने कमी प्रदूषण होते

केंद्र सरकारने घरगुती वापरासाठी १०० टक्के नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, आता पीएनजी नेटवर्क उपलब्ध असलेल्या ठिकाणी त्याची जोडणी घेणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार आम्ही नियोजन सुरू केले आहे. जोडणीचा अर्ज आल्यानंतर आम्ही त्वरित पुरवठा सुरू करत आहोत.

- प्रतिनिधी, एमएनजीएल

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.