गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणनेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच दिवस हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यानंतरही इराणकडून इस्त्रायल आणि आखाती देशांवर हल्ले सुरूच आहेत. यादरम्यान इराणने भारतासह काही देशांचे अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत.
इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करताना त्या क्षेपणास्त्रांवर भारतीयांसाठी संदेश लिहिला आहे. या क्षेपणास्त्रावर “भारताच्या लोकांचे आभार” असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर हे क्षेपणास्त्र इस्त्रायलच्या दिशेने डागण्यात आले. याशिवाय, इराणने इतर काही देशांचेही अशाच पद्धतीने आभार मानले आहेत. एका क्षेपणास्त्रावर जर्मनी, पाकिस्तान, स्पेन यांसारख्या देशांसाठीही संदेश लिहिण्यात आला आहे. त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने सांगितले की, शुक्रवारी इस्त्रायलवर ८३वा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात लांब पल्ल्याची आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे तसेच ड्रोनचा वापर करून इस्त्रायलच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. तसेच खाडी देशांवरही अशाच प्रकारचे हल्ले करण्यात आले आहेत. इराणने दिलेल्या माहितीनुसार, बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या हवाई संरक्षण प्रणालीलाही लक्ष्य करण्यात आले.
दरम्यान, २८ फेब्रुवारीपासून इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात संघर्ष सुरू आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांची हत्या झाल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यानंतर इराणने केवळ इस्त्रायलच नव्हे, तर कतार, बहरीन, सौदी अरेबिया यांसारख्या खाडी देशांतील अमेरिकन तळांनाही लक्ष्य केले आहे.