Amravati Crime : डोक्यावर गोळी झाडून क्यूआरटी जवानाची आत्महत्या; पोलिस आयुक्तालयाच्या बेसमेंटमधील घटनेमुळे खळबळ
esakal March 27, 2026 11:45 PM

अमरावती - आयुक्तालयातील क्यूआरटीत (शीघ्र कृती दल) कार्यरत पोलिस शिपायाने स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यावर गोळी झाडून जीवन संपविल्याच्या घटनेमुळे शहर पोलिस दलात खळबळ उडाली. विजय दिलीप नागापुरे (वय-३२, रा. धामणगाव काटपूर, ता. मोर्शी) असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस जवानाचे नाव आहे.

गुरुवारी (ता. २६) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सदर घटनेमुळे संपूर्ण आयुक्तालयात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोपविलेल्या कर्तव्यामध्ये तत्पर, विभागातले कोणत्याही प्रकारचे कामाचे दडपण नाही. कौटुंबिक कलहसुद्धा नाही, असे असताना तरुण पोलिस शिपायाने आत्महत्या केल्याने समाजमन सुन्न आहे.

विजय नागापुरे याच्यासह एकूण आठ जणांच्या क्यूआरटी चमूची बुधवारी (ता. २५) ते गुरुवारी (ता. २६) पहाटेपर्यंत, अशी नाइट ड्यूटी लागली होती. विजय वगळता इतर सातही पोलिस कर्मचारी आळीपाळीने आपले शस्त्र जमा करण्यासाठी मुख्यालयात गेले. विजय हा एकटाच आपल्या क्यूआरटीच्या खोलीत होता.

गुरुवारी सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी बदली कर्मचारी आकाश अंबर्ते हा पोलिस शिपाई क्यूआरटीच्या खोलीत शिरला असता, त्याला विजय दिलीप नागापुरे हा रक्ताच्या थारोळ्यात खोलीत जमिनीवर पडलेला दिसला. त्याने घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पोलिस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, उपायुक्त श्याम घुगे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण, फ्रेजरपुराचे निरीक्षक रोशन शिरसाट यांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

आपल्या समवयीन पोलिस शिपायाने अचानक आत्महत्या केल्याचे कळताच महिला कर्मचाऱ्यांसह अख्ख्या पोलिस आयुक्तालयाचे कर्मचारी सीपी कार्यालयाच्या बेसमेंटमध्ये पोहोचले. फ्रेजरपुरा पोलिसांनी याप्रकरणात अकस्मात मृत्यू, अशी नोंद घेतली. आत्महत्येचे कारण अद्याप समजून आले नसून तपास सुरू असल्याचे उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले.

ग्लॉक पिस्टलमधून झाडली गोळी

२६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर क्यूआरटी पथकात कार्यरत जवानांना ग्लॉक पिस्टल हे अत्याधुनिक शस्त्र देण्यात आले. त्यात एकाच वेळी १५ राउंड भरलेले असतात. त्यापैकी एक राउंड विजय नागापुरे याने स्वत:वर फायर केला, असे पोलिस उपायुक्तांनी सांगितले.

१२ वर्षे नोकरी करणारा पोलिस शिपाई विजय नागापुरे कर्तव्यात तत्पर होता. २०१४ साली शहर पोलिस दलात दाखल झाला होता. त्याने आतापर्यंत आयुक्तालयात आरसीबी, पोलिस मुख्यालय व गत चार वर्षांपासून शीघ्र कृती दलात (क्यूआरटी) कर्तव्य बजावले आहे.

- गणेश शिंदे, पोलिस आयुक्त, अमरावती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.