IPL 2026: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी विराट कोहली फिट आहे की नाही? हेड कोच म्हणाले..
GH News March 28, 2026 01:10 AM

आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीचा पहिलाच सामना विस्फोटक फलंदाज असलेल्या सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना 28 मार्चला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीला पुन्हा एकदा टी20 फॉर्मेट खेळताना पाहण्याची संधी आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विराट कोहलीने 2024 मध्ये निवृत्ती घेतली. त्यानंतर आयपीएल 2025 स्पर्धेत खेळला होता. आता बरोबर एका वर्षांनी विराट कोहली टी20 फॉर्मेट खेळण्यासाठी उतरणार आहे. सराव सामन्यात विराट कोहलीने आपल्या आक्रमक शैलीची झलक आधीच दाखवून दिली आहे. विराट कोहलीने 19 चेंडूत 45 धावा केल्या. पण पहिल्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. त्यावर अँडी फ्लॉवर यांनी अपडेट दिले आहेत.

आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी आरसीबीच्या पहिल्या सामन्यापूर्वी मीडियाशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विराट कोहलीच्या फिटनेसबाबत अपडेट दिली. अँडी फ्लॉवर यांनी सांगितलं की, ‘त्याची जिद्द अजूनही कायम आहे. मला वाटते की तो मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खूप स्थिर आहे. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून विकसित होण्यासाठी तो स्वतःला योग्य स्थितीत ठेवत आहे. सरावात त्याला चेंडूचा अचूक अंदाज घेताना पाहून असे वाटते की तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. ‘

अँडी फ्लॉवरने सांगितलं की, आम्ही या मधल्या कालावधीबद्दल बोललो आहोत. खेळण्याशिवाय मला अव्वल खेळाडूंचा सराव पाहायला खूप आवडतो. मी खेळत असताना सचिनला सराव करताना पाहिलं आहे. आता एक प्रशिक्षक म्हणून मला महान खेळाडूंचा सराव पाहायला आवडतो. मी कोहलीला सराव करताना पाहिले आहे आणि मला वाटते की तो त्याच्या खेळाच्या शिखरावर आहे. त्याला माहित आहे की तो कमी क्रिकेट खेळत आहे, पण तरीही तो त्याच्या खेळाच्या शिखरावर आहे. विराट कोहलीची टी20 क्रिकेटमधील फॉर्मचा अंदाज घेणं कठीण आहे. कारण मधल्या काळात टी20 सामने खेळण्याचा प्रश्न येत नाही. पण सराव करताना अँडी फ्लॉवर यांनी केलेलं निरीक्षण पाहता पहिल्या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.