आयपीएलच्या 19 व्या पर्वात शनिवारी 28 मार्चला गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सलामीचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. आरसीबी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध भिडणार आहे. हा सामना आरसीबीच्या होम ग्राउंडमध्ये अर्थात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्या अनुपस्थितीत इशान किशन याच्याकडे सनरायजर्स हैदराबादच्या नेतृत्वाची सूत्र देण्यात आली आहेत. पॅटला दुखापतीमुळे या मोसमातील काही सामन्यांना मुकावं लागणार आहे.
आरसीबीने गेल्या हंगामात 18 वर्षांची प्रतिक्षा संपवत आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामिगरी केली होती. त्यानंतर या मोसमातील पहिलाच सामना आरसीबीच्या होम ग्राउंडमध्ये होत आहे. त्यामुळे या पहिल्याच सामन्याला मोठ्या प्रमाणात आरसीबी चाहते उपस्थिती लावणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे चाहत्यांना आरसीबीकडून विजयी सलामीची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे चाहत्यांचं विराट कोहली याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. या निमित्ताने विराटची सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कामगिरी कशी राहिली आहे? हे जाणून घेऊयात.
विराटने गेल्या मोसमात आरसीबीसाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे विराटकडून या मोसमातही चाहत्यांना तसाच तडाखा अपेक्षित असणार आहे. विराटने या स्पर्धेच्या इतिहासात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध एकूण 24 सामन्यांमध्ये 142 च्या स्ट्राईक रेटने 805 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 1 शतक आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत.
विराट आरसीबीसाठी 19 व्या पर्वात सलामीला खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. विराटला आरसीबीसाठी ओपनिंग करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. विराटने आरसीबीसाठी 128 सामन्यांमध्ये ओपनिंग केली आहे. विराटने या दरम्यान ओपनर म्हणून 46.8 च्या सरासरीने 5 हजार 9 धावा केल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये ओपनर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट तिसऱ्या स्थानी आहे.
विराटने आरसीबीचं होम ग्राउंड असलेल्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 94 सामने खेळले आहेत. विराटने या 94 सामन्यांमधील 91 डावांत 3 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराटने 40 अधिकच्या सरासरीने 3 हजार 202 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध घरच्या मैदानात कशी कामगिरी करतो आणि किती धावा करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.