Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी
esakal March 28, 2026 02:45 PM

Kolhapur Crime News : बिद्रीतील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या दोन नर्ससह चार एजंटांना पोलिसांनी अटक केली. संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. डॉ. युवराज पाटीलने गर्भपात केल्यानंतर काही अर्भके नातेवाइकांकडे सुपूर्द केली जात होती. तर काही अर्भके आक्काताई कांबळे (रा. बिद्री) हिच्याकडे सोपविली जात होती. आक्काताईकडे अर्भकांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी होती, अशी कबुली डॉ. पाटीलने पोलिसांसमोर दिली.

अटक केलेल्यांत मनीषा दिनकर कांबळे (वय ३५, रा. सावर्डे पाटणकर, ता. राधानगरी), नंदा ईश्वरा गुरव (४२, रा. बोरवडे, कागल) या दोन नर्ससह एजंट बाजीराव श्रीपती तिकोडे (६०, मडिलगे बुद्रुक, भुदरगड), विक्रम आनंदा पाटील (४०, सोनाळी, कागल) व सुखदेव ऊर्फ पोपट पांडुरंग पाटील (वय ४०, रा. सोनाळी, ता. कागल) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात डॉ. युवराज पाटील (वय ४३, रा. सोनाळी) एजंट संभाजी शिंदे (४५, रा. बोरवडे) या दोघांना अटक करून पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह गर्भपाताच्या गोळ्या, रोख रक्कम, मोटार असा मुद्देमाल जप्त केला होता. संशयितांकडे करण्यात आलेल्या चौकशीत आणखीन सात ते आठ जणांची नावे उघड झाली. यानुसार आज सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

बदलीचा फायदा होणार का?

पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना या गर्भलिंग निदान केंद्राची माहिती मिळाली होती. त्यांनी विश्वासाने पुढील कारवाईची जबाबदारी इस्पुर्ली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या क्रांती पाटील यांच्याकडे दिली. याप्रकरणी गुन्हा मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल असला तरी तपास पाटीलच करीत होत्या. दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

यामध्ये सहाय्यक निरीक्षक क्रांती पाटील यांची बदली मुरगूड पोलिस ठाण्यातच झाली आहे. यामुळे बदलीचा फायदा घेऊन त्या गर्भलिंग निदान व गर्भपात रॅकेटच्या मुळापर्यंत जाणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Sangli Crime News : पैसे चोरल्याचा संशय, बापाची शिक्षा मुलींच्या जीवावर, ३६ तास तुळईला उलटे टांगून आई -बाप तिथेच झोपले, एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर

महिलांच गुन्ह्यात सहभागी

गर्भातील कळ्या खुडण्यामध्ये श्रद्धा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा कांबळे व नंदा गुरव या दोन नर्सचा सहभाग दिसून आला. या दोघीही गर्भपातावेळी डॉ. पाटीलसोबत असायच्या. गर्भपात केल्यानंतर मृत अर्भके नातेवाइकांकडे देऊन त्याची विल्हेवाट लावण्यास सांगितले जायचे, अशी माहिती समोर आली. तर, ज्या नातेवाइकांकडून अर्भके फेकण्यास नकार मिळायचा, अशी अर्भके आक्काताई कांबळे हिच्याकडे सोपविली जायची. ती पुढे या अर्भकांची विल्हेवाट कशी लावायची, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. काही अर्भके तिने उघड्यावरच फेकल्याचेही डॉ. पाटील यांच्या चौकशीत समोर येत आहे.

पेशंटकडेही होणार चौकशी

श्रद्धा हॉस्पिटलमध्ये टाकलेल्या छाप्यावेळी तेथे आलेल्या पेशंटची यादी मिळून आली आहे. यामध्ये किती जणांनी मुलांना जन्म दिला?, किती महिलांचा गर्भपात करण्यात आला? याची माहिती घेतली जाणार आहे. अटक केलेल्या चार संशयितांनीही कोणाकोणाला या हॉस्पिटलमध्ये आणून गर्भलिंग निदान केले, त्यांच्यामध्ये किती महिलांचा गर्भपात झाला, याचाही सखोल तपास केला जाणार असल्याचे तपास अधिकारी क्रांती पाटील यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.