Iran War Live Update: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. युद्धाच्या दुसऱ्या महिन्यात प्रवेश करताच, इस्रायलने इराणवर जोरदार हल्ले केले आहेत. इस्रायलच्या हवाई दलाने इराणमधील सर्वात सुरक्षित आणि गोपनीय मानल्या जाणाऱ्या अणू केंद्रांना (Nuclear Sites) लक्ष्य केले आहे. या हल्ल्यामुळे इराणच्या अण्वस्त्र क्षमतेला मोठा धक्का बसला असून, यामुळे संपूर्ण परिसरात किरणोत्सर्गाचा (Radiation) धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त होत आहे. इराणने या घटनेला "मानवतेविरुद्धचा गुन्हा" ठरवत पलटवार करण्याचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे, इराणच्या अणू केंद्रांवरील हल्ल्याचा बदला म्हणून इराण समर्थक गटांनी सौदी अरेबियातील 'प्रिन्स सुल्तान एअर बेस' या अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्र डागली आहेत. या भीषण हल्ल्यात अनेक अमेरिकन सैनिक जखमी झाले असून तळावरील तांत्रिक यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. सौदी अरेबियाच्या भूमीवर झालेला हा हल्ला अमेरिकेसाठी थेट आव्हान आहे. राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या सौदीलाही या युद्धात सक्रिय व्हावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीमध्ये रोखण्यात आलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या ढिगाऱ्यामुळे पाच भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
दुसरीकडे, इराण युद्धाला चार आठवडे उलटल्यानंतरही, आखाती देशांमध्ये हल्ले आणि क्षेपणास्त्रे रोखण्याचे प्रकार सुरूच आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE), हवेतच रोखण्यात आलेल्या एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मलबा अबू धाबीच्या खलिफा इकॉनॉमिक झोनजवळ पडल्याने दोन ठिकाणी आग लागली. या घटनेत पाच भारतीय नागरिक जखमी झाले. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने रियाधच्या दिशेने रोखलेले एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नष्ट करण्यात आल्याचे सांगितले. बहरीनमध्ये, इराणने लक्ष्य केलेल्या एका परिसरातील आग नागरी संरक्षण दलाने विझवली. कुवेतमध्ये, नॅशनल गार्डने गेल्या 24 तासांत सहा ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे.
इराण-इस्रायल युद्धाला 28 दिवस उलटल्यानंतर आता हौथी बंडखोरही या संघर्षात सामील झाले आहेत. टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, येमेनमधील इराण-समर्थित हौथी बंडखोरांनी सुमारे 2 हजार किलोमीटर अंतरावरून इस्रायलच्या दक्षिणेकडील बेअरशेबा शहर आणि आसपासच्या परिसराला लक्ष्य करून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची माहिती मिळताच हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आणि हवेतच तो धोका नष्ट करण्यात आला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सध्याच्या युद्धादरम्यान येमेनकडून इस्रायलवर झालेला हा पहिलाच हल्ला असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी, गाझा युद्ध सुरू झाल्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये हुथींनी इस्रायली जहाजे आणि नौदलाच्या नौकांवर हल्ले केले होते. इस्रायलने त्याला प्रत्युत्तर दिले होते. तथापि, ऑक्टोबर 2025 मध्ये हमास आणि इस्रायल यांच्यात झालेल्या युद्धविरामानंतर हुथी बंडखोरांनी इस्रायलवरील हल्ले थांबवले.
इतर महत्वाच्या बातम्या