पशुपालकांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये मोठा बदल; दुधाळ जनावरे, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्यांसाठी मदतीची रक्कम ठरली
अभिषेक मुठाळ March 28, 2026 05:43 PM

मुंबई : राज्यात गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या मदतीमध्ये आता महत्त्वाचे बदल करून त्याची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. या मदतीमध्ये टाकण्यात आलेल्या अटींमध्ये बदल करून सर्व पशुपालकांसाठी सरसकट मदतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जे पशुपालक शेतकरी या मदतीमधून आधी वगळण्यात आले होते त्यांनाही मदत मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नियमात महत्त्वाचा बदल करून मोठा दिलासा देण्यात आला आहे. मृत पावलेल्या जनावरांच्या मर्यादेची अट शिथिल करण्यात आली असून पुरात मृत पावलेल्या सर्व जनावरांसाठी आता मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मृत झालेल्या जनावरांसाठी आणि गोठ्याच्या नुकसानीसाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

नियमात केले हे महत्त्वाचे बदल

- अल्प, अत्यल्प भूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांऐवजी सर्व अपादग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र राहतील.
- प्रत्येक पशुपालकांना कमाल 3 मोठ्या दुधाळ आणि ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांऐवजी मृत, बेपत्ता असलेली सर्व दुधाळ जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.
- प्रत्येक पशुपालकांना कमाल 6 ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांऐवजी मृत, बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.
- प्रत्येक पशुपालकांना कमाल 30 लहान दुधाळ जनावरांऐवजी मृत, बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.
- प्रत्येक पशुपालकांना कमाल 100 कुक्कुट पक्षांसाठी 10 हजार रुपयांच्या मर्यादेऐवजी मृत व बेपत्ता असलेले सर्व कुक्कुटपक्षी मदतीसाठी पात्र असतील. 

पशुपालकांना अशी मिळेल मदत

- पडझड आणि नष्ट झालेल्या गोठ्यांसाठी 3 हजार रुपये मिळणार.

- मृत दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर 37 हजार 500 रुपये जाहीर.

- ओढकाम करणाऱ्या जनावरांच्या मृत्यूसाठी 32 हजार रुपये मिळणार.

- मृत पावलेल्या हान जनावरांसाठी 20 हजार रुपयांची घोषणा.

- प्रति शेळी आणि मेंढीसाठी 4 हजार रुपयांची मदत जाहीर.

- कुक्कुटपालन करणाऱ्यांना प्रति कोंबडी 100 रुपये देणार.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.