Mission Urja Project : दुर्गम आदिवासी पाड्यांत 'मिशन ऊर्जा'चा प्रकाश; सौरऊर्जेवर आधारित उपक्रमाच्या विस्तारासाठी सामूहिक मदतीची गरज
esakal March 29, 2026 03:45 AM

पुणे - सह्याद्रीच्या दुर्गम भागातील आदिवासी पाडे मूलभूत सोयी-सुविधा आणि विकासापासून अजूनही दूर आहेत. शासकीय व प्रशासकीय स्तरावर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमुळे आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या समाजविधायक उपक्रमांमुळे अनेक योजना आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. राज्यपातळीवर वीजजोडणी वाढली, डोंगराळ भागात वीजपुरवठा अनियमित असतो. पुण्यातील ‘ट्री इनोवेटिव्ह फाउंडेशन’ २०२२पासून ‘मिशन ऊर्जा’ उपक्रमांतर्गत राज्यातील दुर्गम भागात देणगीदारांच्या मदतीने सौरऊर्जेचा वापर करून आदिवासी पाड्यांना प्रकाशमान बनविण्याचे कार्य करत आहे.

उपक्रमाबाबत

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत ‘मिशन ऊर्जा’ उपक्रम कार्यरत आहे. अनेक पाड्यांमध्ये कातकरी आणि इतर उपेक्षित आदिवासी समूह वास्तव्यास आहेत. वीज नसल्याने सूर्यास्तानंतर पाड्यांमधील लोकांच्या हालचालींवर मर्यादा येतात. अंधारामुळे झोपडीबाहेर पडता येत नाही. शिवाय, मुलांना अभ्यास करता येत नाही. लोकांच्या राहणीमानावर, कामावर, शिक्षणावर किंवा हालचालींवर कोणतेही बंधन येऊ नये, या उद्देशाने पाड्यांवर ‘मिशन ऊर्जा’अंतर्गत सौरऊर्जा प्रणाली कार्यरत केली जाते. त्यावर पथदिवे, घरगुती सौर यंत्रणा, सार्वजनिक वापरासाठीची प्रकाश व्यवस्था आणि सौरऊर्जेवर चालणारे कॅमेरे आदी उपकरणे बसविण्यात येतात.

देखभालीचे आर्थिक नियोजन

सौरऊर्जा प्रणालीच्या देखभालीसाठी प्रत्येक गावात पाच सदस्यांची समिती नियुक्त केली जाते, ती महसूल यंत्रणा उभारते. यामध्ये प्रत्येक कुटुंब दरमहा शंभर रुपयांचे योगदान देतो, हा निधी पाच वर्षांसाठी बँक खात्यात जमा केला जातो. सर्व प्रमुख उपकरणे पाच वर्षांच्या वॉरंटीअंतर्गत येत असल्याने पाच वर्षे खर्च येत नाही. त्यानंतर सौरऊर्जा प्रणालीची देखभाल-दुरुस्तीसाठी बँक खात्यात जमा झालेला निधी वापरला जातो. आदिवासी पाड्यांवरील स्थानिक तरुणांना ‘सौर अभियंता’ म्हणून संस्थेकडून प्रशिक्षित केले जाते.

यंदा २५ गावांचे नियोजन

संस्थेचे यंदा पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील २५ गावांमध्ये एक हजार कुटुंबांसाठी ‘मिशन ऊर्जा’ राबविण्याचे नियोजन असून, सौर प्रणालीसाठी एका कुटुंबाला २४ हजार ४७५ रुपयांचा खर्च येतो. यामध्ये घरासाठी घरगुती सौर यंत्रणा, घराबाहेरील पथदिवे, प्राण्यांपासून सुरक्षिततेसाठी अलार्म आणि कॅमेरा आदींचा समावेश आहे.

उपक्रमाची व्याप्ती

  • ४० - प्रकाशमान झालेली गावे

  • ६९५ - सौर पथदिवे

  • ६.८ - दैनंदिन सौर ऊर्जा क्षमता

  • ४.७ - नवीकरणीय ऊर्जा

  • १,४०० - घरगुती सौर यंत्रणेचे लाभार्थी कुटुंबे

  • ८,४०० - लाभार्थी व्यक्ती

  • ४,१०० - कार्बन क्रेडिट

बदलले चित्र

  • सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांमुळे सूर्यास्तानंतर नागरिकांचा गावातील संचार वाढला

  • घरगुती सौर यंत्रणेमुळे निर्माण झालेल्या प्रकाश व्यवस्थेमुळे मुलांना रात्री अभ्यास करणे सोयीचे झाले

  • पाड्यांवरील जीवन स्थिर होऊन लोकांचे स्थलांतर थांबले

श्रुतिकाच्या प्रकृतीत सुधारणा

गरम पाण्याने ६५ टक्के भाजलेल्या श्रुतिका मदे (वय ३) हिची त्वचा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी ‘समाजभान’ सदरात मदतीचे आवाहन केले होते. त्यास समाजातील दानशूर व्यक्तींनी चांगला प्रतिसाद दिला. अभियानाच्या माध्यमातून जमा झालेला सहा लाख रुपयांचा निधी रुग्णालयाला वर्ग केला. याशिवाय इतर संस्थांकडूनही श्रुतिकासाठी मदत मिळाली. सध्या श्रुतिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

...अशी करा मदत

अधिकाधिक आदिवासी पाडे आणि कुटुंबे प्रकाशमान करण्यासाठी संस्थेला मोठ्या निधीची आवश्यकता असून, यासाठी सामूहिक मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या, औद्योगिक कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिकांनी https://socialforaction.com/ या संकेतस्थळाला भेट देऊन ‘सकाळ सोशल फॉर ॲक्शन फाउंडेशन’ अभियानांतर्गत ‘ट्री-आय फाउंडेशन’ संस्थेच्या ‘मिशन ऊर्जा’ उपक्रमाची माहिती घेऊन ‘डोनेट नाऊ’ बटनावर क्लिक करून देणगी देऊ शकतात. देणगीदारास पावती व ‘८० जी’ हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल. किंवा खालील बँक खात्यात आणि क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन देणगी पाठवू शकता. देणगी ट्रान्सफर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हाट्सअँप क्रमांकावर ट्रान्स्झॅक्शनचे तपशील पाठवावेत.

Name : Sakal Social For Action Foundation

Bank Name : IDBI Bank

A/C No : ०४५९१०२००००२२२७९

IFSC Code : IBKL००००४५९

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.