- रूपेश बुट्टे पाटील
आंबेठाण - खेड तालुक्यासह शिरूर आणि दौंड तालुक्याला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता. खेड) धरणात आज (ता. २८) ६३.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा साठा अधिक आहे.
भामा आसखेड हे भामा नदीवर करंजविहिरे येथे उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता ८.१४ टीएमसी आहे. यावर्षी धरण परिसरात मुबलक म्हणजे १२०३ मिमी पाऊस झाल्याने धरण १०० टक्के भरले होते. भामा नदीवरील आलेगाव पागा पर्यंत असणारे १८ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी आणि नागरवस्तीसाठी या धरणातील पाणी उचलले जाते.
यासंदर्भात श्रेणी १, भामा आसखेडचे सहाय्यक अभियंता अश्विन पवार म्हणाले, ‘पाणी आता जरी जास्त दिसत असले तरी भविष्यात पिंपरी-चिंचवड आणि अन्य पाणी योजना सुरू झाल्यावर पाणी कमी शिल्लक राहील. शेतकऱ्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी ठिबक सारख्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करावा. बंधाऱ्यांची दुरुस्ती याच वर्षी केली जाणार आहे. जेणेकरून पाणी गळती थांबविली जाईल. पाणी योजनेचे पाणी नागरिकांनी जपून वापरावे.’
पिण्यासाठी राखीव पाणी
पुणे महापालिका : २.६७ टीएमसी
पिंपरी चिंचवड महापालिका : २.१५ टीएमसी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (चाकण इंडस्ट्रिअल असोसिएशन आणि १९ गावे योजना) : ०.१७ टीएमसी
चाकण शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा : ०.२५ टीएमसी
आळंदी नगर परिषद : ०.१४ टीएमसी.
कोहिंडे-तळवडे, पाईट या दोन जलजीवन योजना आणि टेकवडी नळ पाणी पुरवठा योजना : ०.११ टीएमसी.
(यापैकी पिंपरी-चिंचवड महापालिका पाणी योजना, चाकण वाढीव पाणीपुरवठा योजना आणि आळंदी नगरपरिषद पाणी पुरवठा योजना अद्याप सुरू झाली नाही.)
सिंचनासाठी पाणी
उन्हाळ्यातील पहिले आवर्तन १४ मार्च ते २४ मार्च दरम्यान सोडण्यात आले. त्यात ०.९४ टीएमसी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. दुसरे आवर्तन बाकी आहे. या दोन्ही आवर्तनासाठी २.५१ टीएमसी पाणीसाठा राखीव आहे.
आगामी रब्बी आवर्तनासाठी १.८० टीएमसी पाणीसाठा राखीव साठा.