- प्रकाश शेलार
खुटबाव (पुणे) - खामगाव (ता. दौंड) येथे चार लाख ८७ हजार रुपये किंमतीच्या आठ किलो गांजा यवत पोलिसांनी जप्त केला. सदर कारवाई शुक्रवार दि.२७ रोजी रात्री उशिरा करण्यात आली. या कारवाईमध्ये आकाश अशोक मोहिते (वय-२३ वर्षे रा. खामगाव, ता. दौंड, जि. पुणे) तसेच सागर उत्तम चव्हाण (रा. खामगाव, ता. दौंड, जि. पुणे) या दोन आरोपीविरोधात यवत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
यवत पोलीसांना खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजे खामगाव ता. दौंड, जि. पुणे येथील पाण्याच्या टाकीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम अवैधरित्या गांजा साठवून त्याची विक्री करीत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे तसेच पोलीस अंमलदार व अंमली पदार्थ विरोधी पथक, कोल्हापूर परीक्षेत्र यांचे पथक, पंच व फॉरेन्सिक टीम यांनी खामगाव येथे छापा टाकला.
यावेळी आकाश अशोक मोहिते याच्याकडे एका पत्र्याच्या शेडमध्ये आठ किलो गांजा आढळून आला. सदर गांजा पोलिसांनी जप्त केला. तपासादरम्यान आरोपी मोहिते याने सदर गांजा हा सागर उत्तम चव्हाण यांच्या सांगण्यावरून विक्रीसाठी ठेवलेला असल्याचे सांगितले आहे. यावरून दोन आरोपी विरोधात यवत पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. कायदा कलम 8(क), 20(ब) तसेच बी.एन.एस. 2023 कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी आकाश अशोक मोहिते यास अटक करण्यात आलेली असून त्यास ३१ मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून, फरार आरोपी सागर उत्तम चव्हाण याचा शोध घेणे सुरू आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे करत आहेत.
सदर कामगिरी उपनिरीक्षक विजय कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे, पो. हवालदार गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, गणेश कुतवळ, दत्ता काळे, हिरालाल खोमणे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक, कोल्हापूर परीक्षेत्र यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.