आरोग्य – जीवनाचा आधार रक्त धातू
Marathi March 29, 2026 07:25 AM

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी

आयुर्वेदात नमूद असलेल्या सात धातूंपैकी एक रक्त धातू. शरीराला सर्व पोषक तत्त्वे पुरवून शरीराचे पोषण करणाऱ्या, आरोग्य टिकवून ठेवणाऱ्या या धातूविषयी. पूर्वीच्या स्त्रिया गर्भवती स्त्रीला आवर्जून कैरी, चिंचा आणून देत. गरोदरपणाच्या काळात हे का खावेसे वाटते, याचे उत्तर आपल्याला रक्त धातूचा अभ्यास करताना रक्त कमी झाल्यावर काय होते त्याचा अभ्यास केला तर कळेल.

आयुर्वेदात रक्त धातूला खूप महत्त्व दिले गेले आहे. इतर सात धातूंबरोबर रक्त हेही व्यक्तीचे जीवन टिकवून ठेवण्याचा एक आधार मानले जाते. हे शरीराला सर्व पोषक तत्त्वे पुरवून शरीराचे पोषण करते आणि आरोग्य टिकवून ठेवते. आयुर्वेदातील ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या दशप्राणायतनांपैकी (दहा महत्त्वाच्या जीवनाधार बिंदूंपैकी) रक्त हा एक आहे. `रक्त धातू’ हा शब्द विविध साहित्यांमधून आला आहे. `शब्दकल्पद्रुम’मध्ये `रंज’ या धातूला `क्त’ प्रत्यय लावून हा शब्द तयार झाल्याचे सांगितले आहे, तर `वाचस्पत्यम्’मध्ये `रंजने कारणे क्त’ असा अर्थ दिला आहे. म्हणजे रंग देणारे किंवा रंग उत्पन्न करणारे.

रक्ताचे समानार्थी शब्द

रुधिर – शरीराला प्राण देणारे, आधार देणारे आणि संरक्षण करणारे. शोणित – लाल रंग दर्शविणारा द्रव. असृक – संपूर्ण शरीरात फिरणारे. अस्र – लाल रंग दर्शवणारे. लोहित – लोखंड (लोह) असलेले असल्यामुळे. क्षतज – शरीराला इजा झाल्यावर सर्वप्रथम दिसणारे म्हणजे रक्त.

भौतिक रचना आणि गुण ः रक्त धातू `तेज’ आणि `जल’ महाभूतांनी बनलेला आहे.

शुद्ध रक्ताचे गुण पुढीलप्रमाणे सांगितले आहेत : इंद्रगोपी (सोनसळी-लाल), पद्म (लाल कमळ), लाख आणि गुंजा फळासारखा रंग, मधुर (गोड) आणि लवण (खारट) रस, स्निग्ध (तेलकट), द्रव (वाहणारे) आणि चल (गतिमान) गुण, न अतिशय गरम, न अतिशय थंड (समशीतोष्ण) , मेंढी (अवी) आणि ससा (शश) यांच्या रक्तासारखे.

रक्तसार व्यक्तीची लक्षणे

ज्या व्यक्तीमध्ये उत्तम रक्त धातू असतो, त्यांची वैशिष्टय़े : डोळे, कान, नाक, ओठ, जीभ, चेहरा, नखे, तळहात, तळपाय, कपाळ आणि जननेंद्रिये लालसर असतात. हे अवयव तेजस्वी आणि चमकदार दिसतात अशा व्यक्ती आकर्षक असतात. त्यांना जास्त मानसिक व शारीरिक ताण सहन होत नाही.

रस धातूची निर्मिती ः अन्नाचे पचन `जठराग्नी’च्या ािढयेमुळे होऊन `आहार रस’ तयार होतो. याच प्रक्रियेत `रस धातू’ तयार होतो. त्यानंतर `रस धात्वाग्नी’च्या ािढयेमुळे रस धातूचे दोन भाग होतात :

स्थायी रस – स्वत रस धातूचे पोषण करणारा.  पोषक रस – पुढील धातू म्हणजे रक्त धातूचे पोषण करणारा.

रक्त धातूचे स्थान यकृत आणि प्लीहा हे रक्त निर्माण व साठवणूक होणारे मुख्य अवयव आहेत. याशिवाय `रक्तवाह स्रोतस’ (रक्त वाहून नेणारी प्रणाली) रक्ताचे वहन करतात.

रक्त धातूची कार्ये

जीवन देणे, शरीराला बल देणे, त्वचेचा तेज व वर्ण राखणे, स्पर्शज्ञान निर्माण करणे, इंद्रियांचे (ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय) कार्य चालवणे, इतर धातूंचे पोषण करणे (धातू पूरण), मांस धातूचे पोषण (मांसपुष्टी), आयुष्य वाढवणे (आयुवृद्धी).

रक्त धातू दूषित होण्याची कारणे

आहारजन्य कारणे : उडीद (माष), कुलथ, हिरव्या पालेभाज्या, जलीय प्राणी, जास्त प्रमाणात दही सेवन, मद्यपान, तिखट व खारट पदार्थांचे अतिसेवन, अति खाणे, विरुद्ध आहार, अपचन, अन्न न पचताही पुन्हा खाणे इत्यादी.

रक्तवृद्धीची लक्षणे

सिरांची पूर्णता (रक्तवाहिन्यांची सूज), विसर्प (त्वचारोग), प्लीहा वाढ (एज्तहदसुत्ब्), वातरक्त (गाऊट), व्यंग (त्वचेवरील डाग), गुल्म (गाठ/टय़ुमर), रक्तपित्त (रक्तस्राव विकार), त्वचा, डोळे व मूत्र यांचा लालसर रंग.

रक्तक्षयाची लक्षणे

महत्त्वाचे लक्षण म्हणजे आंबट पदार्थांची इच्छा वाढणे. सुरुवातीला गर्भावस्थेचा उल्लेख केला आहे त्याचे हे उत्तर. या अवस्थेत रक्त कमी झाल्याने सतत आंबट खाण्याची इच्छा होते.

उपचार : तिखट (कटू), आंबट (आम्ल) व खारट (लवण) पदार्थ टाळावेत.  गोड (मधुर), कडू (तिक्त) व कषाय रसयुक्त आहार रक्तदोषांमध्ये उपयुक्त ठरतो.

पंचकर्म शुद्धीकरण थेरपी: सौम्य उलट्या (उलट्या), विरेचन (अतिसार उपचार), बस्ती (एनिमा), नस्य (नाकातून औषध देणे)

रक्तमोक्षण – रक्त दूषित झाल्यास रक्त काढण्याची ही एक महत्त्वाची प्रािढया आहे. रोगाच्या प्रकारानुसार व दोषानुसार ती केली जाते. मंजिष्ठा, कडुनिंब, गुळवेल, गोक्षुर आणि कोहळा तसेच अनेक रक्तशोधक औषधे, रक्तपित्तहर औषधे, उपवास इत्यादी वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेतल्यास उपयोगी पडतात.

[email protected]

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.