Psychology of boredom : कंटाळा ही क्रिएटिव्हिटीची जननी: स्क्रीनच्या हायपर वेगात हरवलेल्या पिढीला 'नुसतं बसून राहण्याचा' धडा
esakal March 29, 2026 08:45 AM

प्रणव सखदेव, sakhadeopranav@gmail.com

नव्या पिढीला वेग त्यांच्या संवेदनाशील मेंदूच्या सवयीचा होतो. मग प्रत्यक्ष जगातली गती फार मंद वाटून सारखं बोअर झालंय, बोअर झालंय याचं पालूपद सुरू होतं. आणि या बोअरनेसवर पुन्हा अतिवेगवान, हायपर रिअल स्क्रीनचाच उतारा दिला जातो. मुलांना कंटाळू दिलं पाहिजे, म्हणजे मग ती तो जाण्यासाठी वेगवेगळे उपाय म्हणजेच खेळ शोधतात. नाहीतर सतत हायपर राहतात. कंटाळा ही माणसाच्या आयुष्यातली फार म्हणजे फार निकडीची गोष्ट आहे.

ऑफिसमध्ये शेजारच्या क्यूबिकलमधून मोठ्ठी जांभई दिल्याचा आवाज आला आणि त्यामागोमाग ‘ज्याम बोअर झालंय यार आज!’ ही कमेंट.

मी हळूच बाजूला डोकावून पाहिलं. तिने काही सेकंद खिडकीबाहेर पाहिलं आणि मग पटकन डेस्कवरचा मोबाइल उचलला. तो अनलॉक केला आणि अंगठा लागला कामाला – स्क्रोल, स्क्रोल, स्क्रोल! तिचं वय पंचविशीच्या आसपास. माझ्यापेक्षा जवळपास एक पिढी पुढे किंवा पाच वर्षांची एक पिढी असं नवं गणित केलं तर दोन पिढ्या पुढे. उगाच मला मी म्हातारा झालोय असं फीलिंग आलं!

ते बाजूला सारण्यासाठी मी पुन्हा कामात डोकं घातलं. वीस-पंचवीस मिनिटं गेली असतील, नसतील... पुन्हा डोकावून पाहिलं. तिचं अजूनही स्क्रोलिंग सुरूच होतं. एकामागोमाग एक रील येत-जात होत्या. पाककृतींची, खाण्याच्या जॉइंट्सची, हॉटेल्सची, पॉडकास्ट्सची किंवा बाहेर जाताना तयार कसं व्हायचं याची... अशी वेगवेगळी. कंटेटचा पाऊस नुसता, भिजा हवं तेवढं!

मी तिच्याकडे काही मिनिटं एकटक पाहत राहिलो, तरी तिने माझ्याकडे एकदाही डोळे वर करून पाहिलं नाही. मग मात्र मी म्हणालो, ‘अगं, कंटाळा आला होता ना?’

काही सेकंदांनंतर मी काहीतरी म्हणालो आहे, हे तिच्या डोक्यात शिरलं असावं. तिने चमकून वर पाहिलं आणि विचारलं, ‘तू काही म्हणालास का ब्रो?’

मी म्हणालो, ‘हो, या जिवंत माणसाने तुझ्या डिजिटल डेल्यूलूला एक लहानसा धक्का द्यायचा प्रयत्न करत य वर्षापूर्वी विचारलं होतं की तुला कंटाळा आला होता ना?’

ती हसत म्हणाली, ‘य वर्षं? रबिश! आणि उगाच टिपिकल शब्द फेकू नकोस. नागपूर म्हटलं की जसं अबे अबे जोडायचं असं वाटतं लोकांना, तसंच जेन झी म्हटलं डेल्यूलू, नाहीतर सोल्यूलू!’

मी म्हणालो, ‘ओकेके. मुख्य मुद्द्यापासून भरकटायला नको. कंटाळा!’

‘ब्रो, हो प्रचंड प्रमाणात आलाय. डेकॅडंट चॉकलेट डेझर्टमधल्या चॉकलेटसारखा पोअर होतोय अंगावर. म्हणून तर टाइमपास करतेय.’

थोड्या ‘ज्येष्ठत्वा’चा फायदा उठवत मी तिला सांगितलं, ‘ब्रो, कंटाळा आलाय तर वॉकला जा. कुणाशीतरी बोल. पुस्तक वाच. खरं तर काही न करता बसून राहा.’

तिने चकित होत विचित्रसे हावभाव करत विचारलं, ‘नुसतं बसून राहायचं – छे ते काही जमणार नाही. काहीतरी तर केलंच पाहिजे ना यार. सो, आय चूझ धिस.’ तिने मला मोबाइल फोन दाखवला.

मी सांगितलं, ‘तुला माहितेय का कंटाळा येणं फार महत्त्वाचं – खरंतर जीवनावश्यकच असतं आयुष्यात. कंटाळा ही सर्व क्रिटिएटिव्हीची जननी आहे.’

‘जननी म्हणजे ‘आई’ राइट?’ तिने विचारलं. मी मानेनेच होकार दिला. मग म्हणाली, ‘खरंय, तू म्हणतोएस ते. कंटाळा आलाच नाही तर काय होईल... यावर थॉटप्रव्होकिंग काहीतरी लिहिलं पाहिजे. ए तू लिही ना तुझ्या कॉलममध्ये.’

‘मी तर लिहीनच गं. पण तू आता तो स्क्रीन जरा बाजूला ठेव. खिडकीतून बाहेर बघ - ग्रीनरी, ढग, आकाश, खालचं ट्रॅफिक, रहदारी, माणसांचे आवाज ऐक नुसते. पोअर होऊ दे कंटाळा. जस्ट फील इट. काही करू नकोस. फील द टाइम. स्वीमिंग पूलमध्ये कसं आपण डुंबतो ना पाण्यात तसं कंटाळ्यात पडून रहा. जस्ट फ्लोट. डोन्ट रेझिस्ट.’

‘भारी आयडिया आहे ही. पण त्याने काय होईल?’

‘काहीतरी झालं पाहिजेच का नेहमी? सगळ्यातून काहीतरी मिळालंच पाहिजे असा विचार का करायचा सारखा?’ मी तिला विचारलं.

‘व्हॅलिड पॉइंट आहे. मी जरा चक्कर टाकून येते,’ असं म्हणून ती आळस देत गेली.

मला आठवली, माझ्या मुलीच्या वयाची किंवा थोडी मोठी मुलं. कंटाळा आला की स्क्रीन पाहणारी. त्यावरची कार्टून्स किंवा इतर कार्यक्रम इतके वेगाने असतात की तो वेग त्यांच्या संवेदनाशील मेंदूला सवयीची होतो. मग प्रत्यक्ष जगातली गती फार मंद वाटून सारखं बोअर झालंय, बोअर झालंय याचं पालूपद सुरू होतं. आणि या बोअरनेसवर पुन्हा अतिवेगवान, हायपर रिअल स्क्रीनचाच उतारा दिला जातो. मुलांना कंटाळू दिलं पाहिजे, म्हणजे मग ती तो जाण्यासाठी वेगवेगळे उपाय म्हणजेच खेळ शोधतात. नाहीतर सतत हायपर राहतात.

कंटाळा ही माणसाच्या आयुष्यातली फार म्हणजे फार निकडीची गोष्ट आहे. तो प्रत्येक माणसाला येतोच आणि यायलाच हवा. काहीतरी करून त्यावर मात करण्याची आणि सतत प्रोडक्टिव्ह मोडमध्ये राहण्याची धडपड फार केविलवाणी असते. आपण म्हणजे मशीन नसतो. आपलं एक जैविक चक्र असतं. आपल्या शरीराला, मेंदूला काही मर्यादा असतात. मेंदू एका मर्यादेपर्यंत ताण सहन करतो, पण नंतर पुन्हा ताण घेण्यासाठी त्याला थोडं शिथिल, थोडं सैल व्हावं लागतं. तो सतत ताणात राहिला तर एका मर्यादेनंतर मोडून पडू शकतो. म्हणजे मग कामात चुका होतात, किंवा काही सुचेनासं होतं. डोकं हँग होतं. बरेचदा जेव्हा कंटाळा येतो, झोप येईलसं वाटतं, जांभया सुरू होतात, आळस येतो, तेव्हा समजावं मेंदूला, शरीराला ब्रेक हवा आहे. आणि हा ब्रेक एन्जॉय करायला हवा. कारण ताण आणि शैथिल्य यांच्यातल्या परस्पर संबंधांतूनच सर्जनशीलता जन्माला येते. ताणात असताना सगळा फोकस एका गोष्टीवर असतो, पण शिथिलतेच्या अवस्थेत जे पाहिलेलं नसतं किंवा दिसलेलं नसतं ते दिसतं आणि वेगळा रस्ता सापडतो. (आइनस्टाइनला रिलेटिव्हीटीचा शोध झोपेत लागला म्हणे!) कंटाळ्यावर मात करण्यासाठी किंवा कंटाळ्याची पोकळी भरून काढण्यासाठी माणसाने कितीतरी कामांचा, कौशल्यांचा शोध लावला. आपण रोज जी रोजची कर्मं करतो ती सारी या कंटाळ्याचीच तर निष्पत्ती आहेत. नाहीतर आदिमानवासारखं सिम्पल आयुष्य सहज जगता येऊ शकतं, नाही का?

...थोड्या वेळाने ती आली आणि म्हणाली, ‘जरा फिरून आले. मस्त वाटलं एकदम. आता लागते कामाला. थँक्स.’

मी विचारलं, ‘तू ते भाडिपाचे व्हिडियो पाहतेस ना?’ तिने होकार दिला.

‘त्यांनी काही वर्षांपूर्वी ज्याम भारी गाणं केलं होतं – माझ्याशी नीट बोलायचं. व्हिडियोची लिंक पाठवलीये बघ तुला. गाणं सुजय जिबरीश या रॅपरचं आहे. ‘आई आणि मी’वाला, अनि - आलोक राजवाडेही त्यात आहे. त्या तीनेक मिनिटांच्या गाण्यात कंटाळ्याची अख्खी फिलॉसॉफी मांडलीय. केऑसमधून क्रिएशन होतं, तसंच कंटाळ्यातून पण होतं. कंटाळ्याशी डील करावं लागतं, तो मॅनेज करावा लागतो. कंटाळा येत राहिला तरी चालत नाही, पण आला नाही तरी प्रॉब्लेम होतो. चक्र असतं ते, लाइफ सायकलसारखं. कंटाळ्यातून विद्रोह - रिबेलही जन्मतं. जेव्हा लोक त्याच त्या वैतागवाण्या, अन्यायकारी सिस्टिम्सना कंटाळतात, तेव्हा विरोध करू लागतात. या गाण्यातल्या लिरिक्समध्ये काय म्हटलंय बघ - आई विद्रोहाचा विचार कसा मॉडर्नए, नवीनए, तुला जरा तो कळणं म्हणजे कठीणए... किंवा हा बंब थंडच ठेवण्याचा मी जोपासणाराय छंद अनंतापर्यंत, कंटाळ्याचा बघणाराय मी अंत...’ असं म्हणून मी ज्याम हसू लागलो.

‘झाली तुझी लेक्चरबाजी करण्याची हौस? आता मी बोलू...’ तिने डोळे मोठे करत विचारलं.

‘हो, सॉरी. पण विषय जिव्हाळ्याचा असल्याने जरा घुसलो त्यात. हां, बोल ना तू.’

‘आत्ता त्या कंटाळ्याच्या पूलमध्ये स्विम करताना मला एक व्हिज्युअल दिसलं की खूप खूप आधी... प्रीहिस्टॉरिक काळात... आपण म्हणजे सेपियन्स जंगलात राहायचे ना तेव्हा एके दिवशी खूप पाऊस पडला असेल किंवा तसंच काहीतरी घडलं असेल. सो सेपियन्सच्या टोळीला शिकारीबिकारीला जाता आलं नसेल. आता करायचं काय? त्यातला एक जण - मेल किंवा फीमेल कुणीही ज्याम कंटाळला असेल आणि म्हणून त्याने किंवा तिने आसरा घेतलेल्या गुहेच्या भिंतीवर दगडाने प्राण्यांची, पक्ष्यांची चित्रं काढायला सुरुवात केली असेल. आणि हीच असेल माणसाची पहिलीवहिली आर्ट!’

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.