उन्हाळा आहे की पावसाळा? राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग, शेती पिकांना फटका, रस्त्यांवर पाणीच पाणी
एबीपी माझा ब्युरो March 30, 2026 08:43 PM

Maharashtra Weather : सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सध्या उन्हाळा आहे की पावसाळा सुरु आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, या अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर काही भागात जोरदारपाऊस झाल्यामुळं रस्त्यांवर पाणीच पाणी साचलं आहे. याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.

गारपीट आणि अवकाळी पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांच्या नुकसान होण्याची शक्यता 

नंदूरबार जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अचानक गारपीट आणि अवकाळी पावसानं हजेरी लावली. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांच्या नुकसान होण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. 
गेल्या काही दिवसापासून उकाड्यापासून हैरान झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. 

विजेच्या कडकडाटासह बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

बीडमध्ये मागील तासाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस सुरू असल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजावरुन दुपारनंतर ढग दाटून आले होते. त्यानंतर पावसाची रिपझिप सुरू आहे. परंतु या पावसाने अंबा बागेसह भाजीपाला वर्गीय पिकांना देखील फटका बसतोय. बीड, गेवराई, पाटोदा आणि वडवणी परिसरात सध्या पाऊस सुरू आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज वाशिमच्या रिसोड तालुक्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात बीजवाई कांदा, फळबाग,आंबा बाग, भाजीपाला पिकाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवेळी बरसलेल्या पावसामुळं  शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांच्या नुकसान होण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ देखील उडाली आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळं शेतकरी चांगलेच चिंतेत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

पुणे शहरातही जोरदार पाऊस

पुणे शहरातही जोरदार पाऊस झाला आहे. अवकाळी झालेल्या पावसानंतर पुणे शहरातील काही रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. हिंजवडीच्या ब्लु रिच सोसायटी आणि परिसरात मोठी गारपीट झाली आहे. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.