आजवर कोणत्याच देशाला जमलं नाही ते स्पेननं थेट करून दाखवलं; नाटो सदस्य देश असूनही धमक्यांना न घाबरता ट्रम्प यांच्या वाढत्या मनसुब्यांना उधळून लावणारा तगडा निर्णय
जयदीप मेढे March 30, 2026 08:43 PM

Iran War Live Update: स्पेनने अमेरिकेच्या इराणविरोधी मोहिमेसाठी आपले आकाशक्षेत्र (Airspace) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पेनने केवळ आपल्या भूमीवरील लष्करी तळांचा (रोटा आणि मोरोन) वापर नाकारला नाही, तर अमेरिकन लष्करी विमानांना स्पेनच्या आकाशातून उड्डाण करण्यासही बंदी घातली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांचे म्हणणे आहे की, अमेरिकेने इराणवर केलेले हल्ले हे 'एकतर्फी' आहेत. नाटो, संयुक्त राष्ट्र किंवा युरोपियन युनियनच्या अधिकृत संमतीशिवाय हे युद्ध सुरू असल्याने स्पेनने याला पाठिंबा यापूर्वीच नाकारला आहे.

स्पेन नाटोचा सदस्य असूनही ही भूमिका का?

हा नियम इराणवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व लढाऊ विमानांना, बॉम्बर्सना आणि हवेत इंधन भरणाऱ्या विमानांना (Refueling aircraft) लागू असेल. विशेष म्हणजे स्पेन हा नाटोचा (NATO) पूर्णवेळ सदस्य देश आहे. तरीही त्यांनी ही भूमिका घेण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. स्पेनने इराणवरील हल्ले हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असल्याचे म्हटलं आहे. इराक युद्धाच्या वेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्पेनने युद्धाला नकार धोरण स्वीकारलं आहे. दुसरीकडे, स्पेनमधील जनतेचा मोठ्या प्रमाणावर युद्धाला विरोध आहे. स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी आणि जनतेच्या भावनेचा आदर करण्यासाठी सांचेझ सरकारने ही कठोर भूमिका घेतली आहे. दरम्यान, स्पेन आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी स्पेनला 'व्यापार निर्बंध घालण्याची धमकी दिली होती. या धमक्यांना न जुमानता स्पेनने आपली स्वायत्तता जपली आहे.

युद्ध थांबणार नसले, तरी.. 

जरी स्पेनच्या या निर्णयामुळे युद्ध थांबणार नसले, तरी स्पेनचे आकाशक्षेत्र बंद झाल्यामुळे अमेरिकन विमानांना आता स्पेनला वळसा घालून जावे लागेल. यामुळे उड्डाणाचा वेळ वाढेल आणि इंधनाचा खर्चही प्रचंड वाढेल. स्पेनने आकाशक्षेत्र बंद केले असले तरी, जिब्राल्टरची सामुद्रधुनी (Strait of Gibraltar) ही आंतरराष्ट्रीय जलमार्ग असल्याने तिथून जाणाऱ्या विमानांवर स्पेनला पूर्ण नियंत्रण मिळवता येत नाही. 'ऑपरेशन एपिक फ्युअरी' अंतर्गत अमेरिकन लष्करी विमाने इराणवरील हल्ल्यांसाठी स्पेनच्या हवाई हद्दीचा आणि तळांचा वापर करत होती. मात्र, आज स्पेनने घेतलेला निर्णय हा या प्रक्रियेला पूर्णपणे रोखणारा आहे. अमेरिकेचे B-52 बॉम्बर्स आणि हवेत इंधन भरणारी विमाने (Tankers) ब्रिटन किंवा अमेरिकेहून येताना स्पेनच्या हवाई हद्दीचा वापर करत होती. स्पेनमधील 'रोटा' (Rota) आणि 'मोरोन' (Morón) हे दोन लष्करी तळ अमेरिकेसाठी 'लॉजिस्टिक हब' म्हणून काम करत होते. इथूनच विमाने इंधन भरून पुढे आखाती देशांकडे किंवा थेट इराणच्या दिशेने उड्डाण करत होती.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.