Marathi serial Anandi: स्टार प्रवाहवरील ‘आनंदी’ (Anandi) या नव्या मालिकेने पहिल्याच भागापासून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 30 मार्चपासून सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावरही मालिकेचं भरभरून कौतुक होताना दिसत आहे. एक संवेदनशील आणि वास्तवाशी जोडलेली कथा प्रेक्षकांसमोर आणण्यात निर्मात्यांना यश मिळाल्याचं चित्र सध्या दिसत आहे. (Star Pravah)
मनाला भिडणारी एक कौटुंबिक आणि अंध आणि साध्या सरळ मुलीची कथा या मालिकेतून दाखवण्यात येत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा होती. काल या मालिकेचा पहिला भाग समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही या मालिकेला कौतुकाची थाप मिळतेय.
आनंदी या मालिकेत अभिनेते अरुण नलावडे आनंदी या पात्राच्या आजोबांची भूमिका साकारणार आहे. आत्माराम जाधव, असं त्यांच्या पात्राचे नाव आहे. तर, समीर धर्माधिकारी हे प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांची भूमिका साकारणार आहेत. या निमित्ताने दोन दिग्गज कलाकार बऱ्याच काळानंतर मालिकेच्या विश्वात पुनरागमन करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये ही मालिका पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'आनंदी' या मालिकेत मुख्य भूमिका अभिनेत्री जाई खांडेकर (Jaee khandekar) साकारत आहे. ती या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण करत आहे. पहिलीच मालिकेत अंध तरुणीची भूमिका साकारणं हे खरंच आव्हानात्मक असलं तरीही, अभिनेत्रीने सहजतेने 'आनंदी' ही व्यक्तीरेखा सुंदररित्या साकारलीये. एकूणच, ‘आनंदी’ मालिकेने पहिल्याच भागात प्रेक्षकांची मनं जिंकत दमदार सुरुवात केली असून पुढील भागांबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे
View this post on Instagram
सोशल मीडियावर पहिलाच भागानंतर या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत मालिकेचा पहिला भाग प्रचंड आवडल्याचं लिहिलंय. एका युजरने लिहिलं, ' आजचा एपिसोड खूप मस्त होता. आम्हाला खूप आवडला. माझे आई-वडील दोघेही अंध आहेत पण त्यांनी आजचा भाग पाहिला आणि त्यांना कथा खूप आवडली.' अनेक प्रेक्षकांनी पहिला भाग खूप आवडल्याचं कमेंट मध्ये लिहिला आहे.