Eknath Shinde : मोठी बातमी! मंत्रिमंडळात मोठे फेरबदल? एकनाथ शिंदेंची नाराजी कुणाला भोवणार? ते दोन मंत्री रडारवर
Tv9 Marathi March 31, 2026 01:45 PM

Eknath Shinde Shivsena : राज्यात सध्या महायुतीतील मंत्र्यांचे प्रताप समोर येत आहे. काहींच्या वक्तव्याने तर काहींच्या कृतीने जनमाणसात चुकीचा संदेश गेला आहे. त्यातच चेकमेटचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची विकेट पडल्यानंतर मित्र पक्षातील मंत्री सावधगिरी बाळगत आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षातील नेत्यांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नाराजीमुळे पक्षातील दोन मंत्र्यांवर कारवाईची शक्यता आहे. मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये काही मंत्र्यांच्या खातेबदल होण्याची शक्यता आहे.

ते दोन मंत्री कोण?

उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे आमदार दीपक केसरकर यांच्यासह पक्षातील दोन मंत्र्यांवर नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे दीपक केसरकर यांच्यावर होत असलेले आरोप आणि काही जिल्ह्यांत पक्षाची घटलेली ताकद यामुळे शिंदे नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक २०२६ मधील अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्याने शिंदे यांनी अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. याआधी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीतही पक्षाच्या काही नेत्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे समोर आले होते. तर जिल्हा परिषद निवडणुकीत काही मंत्र्यांची आणि शिवसेनेच्या आमदारांची कामगिरी सरस नसल्याचे समोर आले होते. काही ठिकाणी वाद झाले. कॅमेऱ्यासमोरच जे वर्तन झाले, त्यातून पक्षाची प्रतिमाही डागळल्याचा आरोप करण्यात येत आहे. या सर्वांचा परिणाम आता काही दिवसात मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळात मोठा फेरबदल?

सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काळात मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून काहीमंत्र्यांची जबाबदारी बदलली जाऊ शकते. या मंत्र्यांना अगोदर ताकीद देण्यात येईल. तर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता न दाखवता त्यांचे खातेबदल होण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांची खातेतंर्गत कामगिरीही सरस नसल्याने अशा नॉन परफॉर्मन्स नेत्यांना खातेबदल करून थेट इशारा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर आता हे मंत्री कोण अशी चर्चा रंगली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.