मार्चमध्ये चांदी 53000 रुपयांनी स्वस्त, सोन्याच्या दरात 18000 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवे दर
Marathi March 31, 2026 08:25 PM

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात मार्च महिन्यात मोठी घसरण पाहायला मिळाली. एकीकडे शेअर बाजार देखील मार्च महिन्यात घसरला. दुसरीकडे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असलेल्या सोने आणि चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. दोन देशांमध्ये संघर्ष सुरु होताच सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. यावेळी मात्र अमेरिका आणि इराण युद्धात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

आज महावीर जयंती निमित्त कमोडिटी मार्केट बंद आहे. मात्र, गेल्या महिन्यात शेवटच्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारीपासून 30 मार्चच्या दरांचा विचार केला असता मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीच्या दरात 53000 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे सोन्याच्या वायद्याचे दर देखील 18000 रुपयांनी घसरले आहेत.फक्त मल्टी कमोडिटी एक्सचेंज नव्हे तर देशांतर्गत बाजारातदेखील सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

एक किलो चांदीचा दर किती?

चांदीच्या दराचा विचार करायचा असल्यास मार्च महिन्याच्या सुरुवातीला असलेले दर पाहावे लागतील. 27 फेब्रुवारीला मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा एक किलोचा दर 282644 रुपये किलो इतका होता. मार्च महिन्याच्या कारभाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच 30 मार्चला चांदीच्या वायद्याचा दर 229033 रुपये किलो झाला आहे. या हिशोबानं एका महिन्यात चांदीचा दर 53611 रुपये किलो इतका कमी झाला आहे.

देशांतर्गत बाजाराचा विचार केला असता इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या दरानुसार 27 फेब्रुवारीला 266700 रुपये किलो हाता. सोमवारी म्हणजेच 30 मार्चला चांदीचा एक किलोचा दर 230135 रुपये इतका होता. म्हणजेच एका महिन्यात देशांतर्गत बाजारात चांदीचा दर 36565 रुपयांनी कमी झाला आहे.

सोन्याच्या दरात घसरण

एमसीएक्सवर चांदीच्या दराप्रमाणं सोन्याच्या दरात देखील घसरण झाली आहे. एमसीएक्सवर 27 फेब्रुवारीला सोन्याचा दर 165659 रुपये 10 ग्रॅम इतका होता. तर, 30 मार्चला एमसीक्सवर सोन्याचा दर 147450 रुपयांवर आला आहे. म्हणजेच एका महिन्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 18209 रुपयांनी कमी झाला आहे.

आयबीजेएच्या दरांनुसार देशांतर्गत बाजारात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सोन्याचा दर 159097 रुपये एक तोळा इतका होता.  30 मार्चला एका तोळ्याचा दर 146733 रुपये इतका होता. या हिशोबानं 24 कॅरेट सोन्याचा दर 12364 रुपयांनी कमी झाला आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.