मांजरीच्या पिल्लाला जखमी करूनही बेफिकीरी
esakal April 01, 2026 08:45 PM

मांजरीच्या पिल्लाला जखमी करूनही बेफिकिरी
मालाडमधील सोसायटी प्रशासनावर आरोप
मुंबई, ता. १ : मालाड (पश्चिम) येथील विकास पार्क सोसायटीमध्ये मांजरीच्या पिल्लाला अमानुष वागणूक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कारच्या इंजिनमध्ये शिरू नये म्हणून एका ड्रायव्हरने पिल्लाला जोरात ओढून बाहेर काढल्याने त्याच्या मागच्या पायाला गंभीर दुखापत झाली. स्थानिक रहिवासी व प्राणीकल्याण अधिकारी डॉ. नंदिनी कुलकर्णी यांनी जखमी पिल्लाला तातडीने प्रोलाइफ स्पेशालिटी वेट क्लिनिकमध्ये दाखल केले.
तपासणीत पिल्लाच्या सायटिक नर्व्हला इजा व हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले. घटनेचा तपास करण्यासाठी डॉ. कुलकर्णी यांनी सोसायटीकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता, व्यवस्थापकांनी दोन हजार रुपयांचे शुल्क भरण्याची अट घातल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून, डॉ. कुलकर्णी यांनी सोसायटी अध्यक्ष, सचिव तसेच मुंबई पोलिस आयुक्त आणि बांगूरनगर पोलिस ठाण्याकडे तक्रार केली आहे.
दरम्यान, सोसायटी व्यवस्थापनाने शुल्क मागणी केल्याचे मान्य केले असले तरी प्रत्यक्षात पैसे घेतले नसल्याचे स्पष्ट केले आहे. सोसायटी नियमानुसार या सुविधेसाठी शुल्क आकारले जाते, असे सोसायटी व्यवस्थापक नेहा टेलर यांनी सांगितले. या प्रकरणावर प्राणीप्रेमींकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.