कुरगाव ग्रामपंचायत वादात
esakal April 01, 2026 08:45 PM

कुरगाव ग्रामपंचायत वादात
नियुक्त अधिकारी पदभारापासून वंचित

बोईसर, ता. १ (वार्ताहर) : पालघर तालुक्यातील कुरगाव ग्रामपंचायतीत अधिकाऱ्यांना प्रशासकीय आदेश असताना पदभार स्वीकारता आलेला नाही. यामुळे कार्यभार हस्तांतर करणाऱ्यावरून प्रशासनातच वाद असल्याची चर्चा रंगली आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या प्रस्तावानुसार अंकुश पिंपळे यांची ग्रामपंचायत कुरगाव येथे बदली करण्यात आली. २६ सप्टेंबर २०२५ रोजी विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर २५ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिकृत आदेश पिंपळे यांनी नियमानुसार पदग्रहणही पूर्ण केले; मात्र प्रशासनाचे आदेश, मान्यता, पदग्रहण प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कार्यभार हस्तांतरण झाले नसल्याने हा प्रकार गंभीर असल्याचे बोलले जात आहे. गटविकास अधिकारी संजय भोये यांनी दिलेले तातडीचे आदेशही अमलात आले नसल्याने प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी कमलेश संखे यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपवण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र प्रत्यक्ष ताबा मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाच्या चर्चांना उधाण आले आहे.
------------------------------------
ग्रामसेविका मासिक बैठकीच्या दिवशीच ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असतात. इतर दिवशी कार्यालयात नसल्याने नागरिकांची महत्त्वाची कामे प्रलंबित राहतात. शिवाय, त्यांची केबिन बहुतांश वेळा बंदच असते, त्यामुळे नागरिकांना कोणतीही मदत मिळत नाही.
- स्मिता संखे, सदस्य, कुरगाव
----------------------------
नियमानुसार संबंधितांना लेखी पत्र सादर केले असून त्यानुसार कार्यभार स्वीकारावा. तसेच कार्यभार सोडण्याबाबतही आवश्यक तो पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे; मात्र संबंधितांकडून हजर करून घेतले जात नसल्याने कुरगाव ग्रामपंचायत तसेच सरपंचांना नोटीस जारी केली आहे.
- संजय भोये, गटविकास अधिकारी, पंचायत समिती पालघर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.