Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश
esakal April 02, 2026 02:45 AM

पुणे - पुणे विभागात मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण वाढत असून, सध्या रुग्णालयांमध्ये १९७० रुग्ण प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत आहेत. यामध्ये १४०० पुरुष आणि ५७० महिलांचा समावेश असून, मूत्रपिंडाच्या आजारांकडे होणारे दुर्लक्ष हे या वाढत्या संख्येचे मुख्य कारण ठरत आहे.

शरीरातील रक्त शुद्ध करणे आणि विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे कार्य मूत्रपिंडे करतात. मात्र, या आजाराची लक्षणे सुरुवातीला अत्यंत अस्पष्ट असल्याने अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी, आजार बळावल्यानंतरच त्याचे निदान होते. मूत्रपिंड पूर्णपणे निकामी होण्यापूर्वीच त्याची लक्षणे ओळखून उपचार घेणे हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याबाबत सतर्क राहून वेळेत तपासणी करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

महिलांनी काय घ्यावी काळजी

महिलांना मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका अधिक असतो. वारंवार होणारा किंवा उपचार न केलेला संसर्ग मूत्रपिंडांपर्यंत पसरून गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतो. जळजळ, पोटदुखी किंवा वारंवार लघवी लागणे म्हणून अल्ट्रासाऊंड किंवा सीटी स्कॅनसारख्या तपासण्या कराव्यात. वारंवार होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करणे किंवा स्वतःच औषधे घेणे धोकादायक वाढते.

प्रारंभिक लक्षणे

अशक्तपणा, लवकर थकवा येणे, रक्तदाब वाढणे, रात्री वारंवार लघवीसाठी उठणे (नॉक्ट्युरिया), लघुशंका करताना फेस येणे, पायांवर सौम्य सूज, रक्ताल्पता (ॲनिमिया), भूक कमी होणे, मळमळ किंवा उलट्या, लघवीतील क्रिएटीनिनमध्ये वाढ आदी.

हा आजार ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखला जातो. सुरुवातीची लक्षणे अस्पष्ट असतात. अनेक वेळा लक्षणे गंभीर झाल्यावरच डॉक्टरांकडे जातात. तोपर्यंत मूत्रपिंडांची कार्यक्षमता प्रभावित झालेली असते. त्यामुळे लघवीची तपासणी आणि मूत्रपिंड कार्याची चाचणी यांसारख्या नियमित आरोग्य तपासण्या लवकर निदानासाठी महत्त्वाच्या ठरतात.

- डॉ. मनीषकुमार माळी, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.