वालधुनी नदीच्या पुनर्जीवनाला बळ
esakal April 03, 2026 05:45 AM

वालधुनी नदीच्या पुनर्जीवनाला बळ
प्रत्यक्ष पाहणीनंतर कामाला वेग येणार
कल्याण, ता. २ (बातमीदार) : एकेकाळी कल्याणची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या वालधुनी नदीला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी आता ठोस पावले उचलली जाणार आहेत. नदीच्या पुनर्जीवनासंदर्भात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून, या कामासाठी आमदार निधीतून तातडीने आर्थिक तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्था’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नदीच्या सद्यःस्थितीबद्दल सविस्तर मांडणी केली. नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी राबवाव्या लागणाऱ्या विविध उपाययोजना आणि तांत्रिक बाबींकडे संस्थेचे अध्यक्ष सुनील उतेकर यांनी लक्ष वेधले. नदी स्वच्छ झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेलच, शिवाय नागरिकांच्या आरोग्यातही मोठी सुधारणा होईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

निधीसाठी पाठपुरावा
नदी पुनर्जीवित करण्यासाठी आवश्यक असलेला निधी आमदार निधीतून तातडीने उपलब्ध करून तो कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे वर्ग करण्यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली. हा प्रकल्प केवळ कागदावर मर्यादित न ठेवता, नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी लवकरच एका विशेष दौऱ्याचे आयोजन केले जाणार आहे. शासन स्तरावर या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून प्रभावी उपाययोजना राबविण्याचे आश्वासन आमदार सुलभा गायकवाड यांनी या वेळी दिले.

सामूहिक जबाबदारीची गरज
नदी स्वच्छ आणि शहर सुंदर ठेवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. वालधुनीच्या स्वच्छतेसाठी आम्ही कटिबद्ध असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल," असे या वेळी स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस संस्थेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या पुढाकारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या वालधुनी नदीला नवसंजीवनी मिळण्याची आशा आता निर्माण झाली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.